रूढी-परंपरांना छेद देत विधवा महिलेने गौरी-गणपती केली विधिवत पूजा

Update: 2021-09-14 12:35 GMT

कोणतेही धार्मिक कार्य करीत असताना विधवा महिलांना म्हणावे तसं स्थान मिळत नसताना रूढी-परंपरांना छेद देत बार्शी येथील विधवा महिलेने विधिवत पूजा करीत आपल्या घरी गौरी-गणपतीचे स्वागत केले आहे. ही घटना बार्शी जिल्हा सोलापूर येथील असून या घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा आहे. या महिलेच्या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत आहे.



सध्या जिल्ह्यात गौरी-गणपतीचं उत्साहात आगमन झालं असून घरोघरी गौरी-गणपती विराजमान झाले आहेत.धार्मिक कार्यक्रमात विधवा महिलांचा थेट सहभाग पाहायला मिळत नाही. तसा स्वीकारही केला जात नाही. कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात विधवा महिलांना कायमच दुय्यम स्थान दिले जात असताना बार्शी येथील विधवा महिलेने गौरी-गणपतीची विधिवत पूजा करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. समाजाने सकारात्मकपणे नोंद घ्यावी. अशी ही घटना असून या महिलेचे स्वागत होत आहे.



बार्शी तालुक्यातील मोहोळ-बार्शी रोडवर कोरफळे गाव असून पती महेश निंबाळकर यांच्या सोबत विनया निंबाळकर या भटक्या विमुक्त व अनाथ मुला-मुलींसाठी निवासी शाळा चालवतात. त्यांचे माहेर बार्शी असून त्या गौरी-गणपतीसाठी माहेरी गेल्या होत्या. माहेरी जाण्यापूर्वी त्यांच्या आईने गौरी-गणपतीच्या पूजेची सर्व तयारी करून ठेवली होती. मात्र,त्यांची आई विधवा आहे. विधवा असतानाही त्यांच्या आईने घरासमोर गौरी आगमनानिमित्त रांगोळी काढली होती. गौरी जेथे बसवल्या जाणार होत्या ती घरातील जागा सजवण्यात आली होती. मात्र, विधवा असलेल्या आईला या सगळ्या पुजेची तयारी करुनही ही पूजा करता येणार नव्हती. ही बाब मुलगी विनया यांना खटकली.



त्यामुळे मुलीने रूढी-परंपरांना छेद देत, माझ्यासाठी तू लक्ष्मी आहेस सांगत आईला गौरी-गणपतीची विधिवत पूजा करण्यासाठी विनंती केली. रोज देवाची पूजा करत असताना मग आज का पूजा चालत नाही,असा प्रश्न उपस्थित केला.शेवटी आई निरुत्तर झाली आणि तिनेच सर्व पूजा-अर्चा केली. विनया समाजातील एक नवीन बदलाची सुरवात केल्याने त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.

Tags:    

Similar News