आजकाल आपल्या समाजात कन्येचा जन्मच नाकारला जातो त्यासाठी अनेक अघोरी उपाय अंमलात आणले जातात. पण सांगली जिल्ह्यातील नलवडे कुटुंबाने पुरोगामी पाऊल उचलत मुलगीचा जन्म झाल्यावर तिच्या जन्मसोहळ्याचे कौतुक करत ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून स्वागत केले आहे.
मुलीचे वडील श्रीकांत नलवडे आणि आई ज्योती नलवडे यांना नुकतेच एक गोंडस कन्यारत्न प्राप्त झाले. नलवडे कुटुंबात गेल्या दोन पिढ्यापासून एकाही मुलीचा जन्म झाला नव्हता. त्यामुळेच यावेळी आपल्या कुटुंबात एका कन्येचा जन्म व्हावा , आणि एक गोड परी आपल्या घरी यावी अशी इच्छा कुटुंबातील सर्वानाच होती. काही दिवसांपूर्वी नलवडे कुटुंबात कन्येचा जन्म झाला. कन्याप्राप्त झाल्यामुळे कुटुंबातील सर्वच आनंदित झाले. आणि या कन्येला हॉस्पिटलमधून घरी घेऊन जाताना त्यांनी ढोल ताशांच्या गजरात तिची जंगी मिरवणूक काढली. आपल्या कन्येचे नाव युवराज्ञी असे ठेवून तिचे घरी मोठ्या थाटामाटात स्वागत केले.
कन्येचा जन्म ज्या समाजात नाकारला जातो अशा समाजातील लोकांना या स्वागतसोहळ्यामुळे चांगलीच चपराक लावण्याचे काम या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या नलवडे कुटूंबियांनी केले आहे. यापूर्वीही या नलवडे परिवाराने अनेक समाजोपयोगी कामे केली आहेत. विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके मोफत वाटून आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे , तसेच मूकबधिर विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हातभार लावला आहे.