भाज्यांचे दर वाढले पण याचा फायदा नक्की कोणाला?

मागच्या काही दिवसांपासून भाज्यांच्या दरात वाढ होत आहे. या दरवाढीची कारणे काय आहेत? आणि या दरवाढीचा फायदा नक्की कोणाला? याबाबत केलेला हा रिपोर्ट नक्की वाचा..

Update: 2022-06-15 13:40 GMT

आज बुधवारी पुन्हा भाज्यांचे दर वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. मुंबईत आज भाज्यांचे दर पाहिले तर टोमॅटो, गाजर, कारले, शिमला मिरची 80 रुपये किलो तर वटाणा 120 रुपये किलो व तोंडली, गवार, भेंडी 80 रुपये किलो व भोपळा 80 रुपये किलो झाल्याचं पाहायला मिळत आहे. आम्ही मुंबईतील चेंबूर येथील स्थानिक भाजी मंडईत जाऊन भाज्यांचे दर काय आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी व्यापाऱ्यांसोबत, सर्वसामान्यलोकांनी देखील भाज्यांच्या वाढलेल्या दरामुळे बजेट कोलमडलं असल्याची भावना व्यक्त केली.

भाज्यांची दरवाढ का होती आहे?

सध्या मागच्या काही दिवसांपासून दररोज भाजीपाल्यांच्या किमतीमध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे ही भाजीपाल्याची वाढ होण्यामागे नक्की काय कारण आहेत हे जाणून घेण्यासाठी आम्ही प्रगतशील भाजीपाला शेतकरी शिवाजी आवटे यांना विचारले असता त्यांनी याविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, आत्ता सध्या बाजारात जो भाजीपाल्याचा येत आहे तो उन्हाळ्यात पिकवलेला आहे. ज्यावेळी या भाजीपाल्याची लागवड केली गेली त्यावेळी हवामानात उष्णतेचे प्रमाण अधिक होते. या वाढलेल्या उष्णतेमध्ये ज्या शेतकऱ्यांना भाजीपाल्याचं पीक पिकवणे शक्य झालं त्यांचाच माला आज बाजारात येत आहे. 2020 या वर्षात मागील दोन वर्षांमध्ये जो आय.एम.डी. (INDIA METEOROLOGICAL DEPARTMENT) चा डेटा उपलब्ध आहे. त्यानुसार सर्वात जास्त उष्णतेचे प्रमाण सातत्याने आपल्या इथं राहिलेले आहे. पण यावर्षी अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी भाजीपाल्याचे उत्पादन घेतलं पण त्यांना ते पिकवता आले नाही. त्यामुळे सध्या बाजारात भाजीपाल्याची कमतरता आहे. त्यामुळेच सध्या भाजीपाल्यांचे दर वाढलेले पाहायला मिळत आहेत. पण त्या अडचणींवर मात करून जे शेतकरी आता बाजारात आले आहेत त्यांना चांगला भाव मिळाला असल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले.

गेल्या वर्षीच्या तुलनेत कांदा, बटाटा, त्याचबरोबर इतर भाज्यांचे भाव सुद्धा तुलनेने दुप्पट झाल्याचं पाहायला मिळत आहे. हे सर्वसामान्य लोकांना काय वाटतं हे त्यांना विचारले असता अनेकांची प्रतिकिया अशी होती की, या दरवाढीचा फायदा जर शेतकऱ्यांना होत असेल तर आम्हाला महाग भाज्या खरेदी करायला काहीच हरकत नाही मात्र या महागाईचा फायदा घेऊन अनेक दलाल आपले खिसे भरत आहेत. त्यामुळे आम्ही या महागाईला त्रस्त झालो असल्याची भावना सर्वसामान्य लोकांनी व्यक्त केली.

दर वाढले मात्र याचा फायदा शेतकऱ्यांना होतो आहे का?

आता मार्केटमध्ये भाज्यांचे दर जे आहेत ते सातत्याने वाढत आहेत. तर या वाढलेल्या दारांचा फायदा शेतकऱ्याला होतो कि दलालांना? या प्रश्नांविषयी भाजीपाला शेतकरी शिवाजी आवटे यांनी सांगितले की, शेतकरी स्वतः मार्केटमध्ये जाऊन आपला माल विकण्याचे प्रमाण फार कमी आहे. मध्यस्थ जे असतात ते सातत्याने वर्षभर फायद्यातच राहतो. शेतकरी हा फक्त सातत्याने खर्च करतो त्याला ठोक भाव हा नेहमीच कमी भेटतो. शेतकऱ्याला जर 20 रुपये किलो भाव मिळत असेल तर तोच माल विक्रेता 20 रुपये पाव किलोने विकत असतो. शेतकरी आणि विक्रेता यांच्यामध्ये जवळपास चार पट फरक राहतो. मध्यस्ती लोकांची वर्षभरच अशी साखळी सुरू असते. शेतकरी ज्या प्रमाणात भांडवल घालून भाजीपाला पिकवतो त्या प्रमाणात त्याला उत्पन्न भेटत नाही. त्याचबरोबर या मागील दोन वर्षात खताचे व मजुरी चे भाव हे देखील दुप्पट झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च हा प्रचंड वाढलेला आहे. ही परिस्थिती शेतकऱ्यांना फार घातक ठरणारी आहे.

तर वरील सर्व माहितीतून आपल्याला हेच लक्षात येतं की, सध्या बाजारात जी दरवाढ होत आहे त्याला प्रमुख कारण म्हणजे बाजारात उपलब्ध असलेला भाजीपाल्याचा कमी पुरवठा हे आहे. त्याचसोबत सध्या भाजीपाल्यांचे जे दर वाढत आहेत त्याचा फायदा काही प्रमाणात शेतकऱ्यांना होत असला तरी त्याहून कैक पटीने हा फायदा मध्यस्थी घेत आहेत.

आज मुंबईच्या भाजी मंडईत भाज्यांचे काय दर आहेत पहा..




 


Tags:    

Similar News