१० महिन्याचे लेकरू सोडून मातृभूमीच्या संरक्षणासाठी निघालेल्या आईला सलाम...

वर्षाराणी पाटील या दहा महिन्याच्या लेकराला घरी सोडुन बीएसएफ मध्ये दाखल झाल्या. रेल्वे स्टेशनवरून ड्युटीवर हजर होताना त्यांच्या जीवाची घालमेल होतं होती पण आईपण बाजूला ठेऊन मातृभूमीच्या रक्षणासाठी ती निघून गेली..

Update: 2023-03-16 10:53 GMT

आज प्रत्येक क्षेत्रात महिलांचा नावलौकिक आहे. असं कोणतंही क्षेत्र नाही ज्या ठिकाणी आता महिला मागे आहेत. घर-दार, लेकरं-बाळ सगळ्यांचा भार डोक्यावर घेऊन प्रत्येक क्षेत्रात महिला आज नवीन काहीतरी करू पाहत आहेत. एक महिला म्हटलं की तिच्या खांद्यावरती अनेक जबाबदाऱ्या आल्या, पण या सगळ्या जबाबदाऱ्यांचं ओझं सहन करत अनेक महिलांनी आज गृहिणी ते अगदी उच्च पदापर्यंत प्रवास केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ज्या क्षेत्रात महिला कामाचं करू शकणार नाही असं म्हंटल जात होत त्या म्हणजे संरक्षण क्षेत्रात देखील महिला आज मागे नाहीत. भारतीय सैन्य दलात महिला कामच करू शकणार नाहीत, हे महिलांचं कामच नाही अशी बुरसटलेली पुरुषी मानसिकता आज अनेक महिलांनी पुसून टाकली आहे. सध्या सोशल मीडिया वरती एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. भारतीय सैन्य दलात कर्तव्य बजावण्यासाठी निघालेल्या एका आईचा हा व्हिडिओ आहे. आपली वाडी-वस्ती, घर-दार, लेकरं-बाळ संपूर्ण संसार मागे सोडून भारत मातेच्या संरक्षणासाठी निघालेल्या या महिलेचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या देखील डोळ्यात अश्रू तरतील...

छोटसं लेकरू घरी सोडून ही आई दुसऱ्या आईचे संरक्षण करण्यासाठी कर्तव्यावर..

सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होणार व्हिडिओ कोल्हापूर जिल्ह्यातील आहे. कोल्हापूरच्या नंदगाव इथल्या वर्षाराणी पाटील या बीएसएफ आहेत. त्या जेव्हा कर्तव्य बजावण्यासाठी निघाल्या त्यावेळी त्यांचं संपूर्ण कुटुंब त्यांना रेल्वे स्थानकावर निरोप देण्यासाठी आले होतो. ज्यावेळी त्यांची रेल्वेत बसण्याची वेळ झाली त्यावेळी सर्वांना अश्रू अनावर झाले. वर्षाराणी यांना दहा महिन्यांचा मुलगा आहे आणि आपलं हे छोटसं लेकरू घरी सोडून ही आई दुसऱ्या आईचे संरक्षण करण्यासाठी कर्तव्यावर जात आहे. आपल्या लेकराला सोडून जातानाची या आईची घालमेल आपल्याला पाहायला मिळते..

आई होणे एवढं सोपं नसत..

ज्ञानेश्वर साळुंखे या फेसबुक वापर कर्त्याने हा व्हिडिओ फेसबुकवर शेअर केला आहे आणि यासोबत एक भावनिक पोस्ट देखील लिहिली आहे. ज्ञानेश्वर आपल्या पोस्ट मध्ये लिहितात.."डोळ्यात पाणी आणणारा व्हिडिओ, आई होणे एवढं सोपं नसत, खूप काही त्याग करावा लागतो. कोल्हापूर जिल्ह्यातल्या नंदगाव इथल्या वर्षाराणी पाटील या दहा महिन्याच्या मुलाला घरी सोडुन बीएसएफ मध्ये दाखल झाल्या. रेल्वे स्टेशनवरून ड्युटी वर हजर होताना त्यांच्या जीवाची चांगलीच घालमेल झाली. आईपण बाजूला ठेऊन मातृभूमीच्या रक्षणासाठी ती निघून गेली. या हृदयस्पर्शी व्हिडीओने अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं."

आपल्या दहा महिन्याच्या लेकराला घरी सोडून कर्तव्यावर जाणं इतकं सोपं आहे का? खरंच वर्षाराणी यांची जिद्द अफाट आहे. त्यांच्या या जिद्दीला त्यांच्या या कार्याला MaxWoman चा सलाम...

Tags:    

Similar News