केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी महिला जूडो लीगमध्ये स्वसंरक्षणावर दिला भर

Update: 2024-09-02 11:52 GMT

नाशिकमध्ये पश्चिम विभागीय अस्मिता जूडो लीगमध्ये प्रमुख पाहुण्या म्हणून केंद्रीय मंत्री सहभागी

देशासाठी आंतरराष्ट्रीय गौरव प्राप्त करण्यात महिलांनी आघाडी घेतली असताना, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे यांनी महिलांनी योग्य कौशल्ये शिकून स्वत:चे संरक्षण करण्याची गरज अधोरेखित केली आहे.

रविवारी नाशिक मधील पंचवटी येथील मीनाताई ठाकरे स्टेडियममध्ये पश्चिम विभागीय अस्मिता जूडो लीगच्या निमित्ताने खडसे बोलत होत्या. ही लीग युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या क्रीडा विभागाच्या खेलो इंडिया या उपक्रमा अंतर्गत महिलांसाठीचा क्रीडा उपक्रम आहे आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणा तर्फे हा उपक्रम चालवला जात आहे.

एकूण 800 स्पर्धक अस्मिता जूडो लीगच्या चार श्रेणींमध्ये सहभागी होत आहेत. वरिष्ठ, कनिष्ठ, कॅडेट आणि उप-कनिष्ठ अशा या चार श्रेणी आहेत. हा कार्यक्रम 31 ऑगस्ट रोजी सुरू झाला असून 3 सप्टेंबर रोजी संपणार आहे.

अस्मिता लीग महिलांना खेळ खेळण्याची संधी देण्याचा प्रयत्न आहे तसेच सामाजिक जागरूकता निर्माण करण्याचे आणि तरुण महिलांमध्ये खेळांमधून आत्मविश्वास निर्माण करण्याचा देखील हा एक उपक्रम आहे.

जूडो हे स्वसंरक्षणाचे कौशल्य शिकण्याचे एक साधन असल्याचे खडसे म्हणाल्या. “आजच्या जगात, विशेषत: महिलांसाठी आणि मुलांसाठी स्वसंरक्षण शिकणे खूप महत्त्वाचे आहे. आज अशा घटना घडत आहेत जिथे तुम्ही स्वतःचे संरक्षण करू शकत नाही,” असे त्यांनी सांगितले.

यासाठी सर्व प्रकारच्या मदतीचे आश्वासन देत, त्यांनी लहान वयापासून स्वसंरक्षण कौशल्ये शिकणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. “आपले मंत्रालय अस्मिता कार्यक्रमाद्वारे महासंघ, प्रशिक्षक आणि खेळाडूंना सर्व प्रकारची मदत सुनिश्चित करत आहे. हा कार्यक्रम सर्व शाळांमध्ये कसा पोहोचवता येईल याबाबतीत मी शिक्षण मंत्रालयाशी देखील चर्चा करेन" असंही त्यांनी यावेळी नमूद केलं.

पश्चिम विभागातील महिला जूडो लीगमध्ये राजस्थानपासून मध्य प्रदेश पर्यंत तसेच गोवा ते दमण आणि दीव पर्यंतच्या सर्व राज्यांतील मुले सहभागी झाली आहेत. केंद्रीय मंत्र्यांनी पालकांना मोठ्या संख्येने त्यांच्या मुलांना अशा उपक्रमांमध्ये सहभागी होऊ द्यावे असे आवाहन केले.

महिलांच्या या जूडो लीगमध्ये मोठ्या प्रमाणावर स्पर्धा दिसून येत आहे.याचे एक कारण म्हणजे जिंकण्यासाठी 4.26 लाख रुपयांची रोख बक्षिसे आहेत.

Tags:    

Similar News