केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२२-२३ या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प Union Budget 2022 संसदेमध्ये सादर केला. देशाच्या अर्थव्यवस्थेवर कोरोनामुळे मोठा परिणाम झाल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. या अर्थसंकल्पात महिला आणि बालकल्याणसाठी काही योजना सरकारने आणल्या आहेत. महिला सक्षमीकरणासाठी मिशन शक्ती आणि सक्षम अंगणवाडी योजना या दोन महत्वाच्या योजना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केल्या आहेत.
सरकारने यावेळी महिला आणि बालकल्याण विभागासाठी मिशन शक्ती, मिशन वात्सल्य, सक्षम अंगणवाडी आणि पोषण २.० सारख्या योजना तयार केल्या आहेत. ज्यामुळे महिलांना याचा लाभ मिळू शकेल, असं निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प मांडताना सांगितलं. तसेच २ लाख अंगणवाड्या अद्ययावत करणार असल्याचेही त्यांनी सांगितलं.
बेटी बचाओ, बेटी पढाओ' उपक्रमाचे सकारात्मक परिणाम, महिला सक्षमीकरण हे सरकारच्या सर्वोच्च प्राधान्यांपैकी एक आहे. मुलगा आणि मुलींना समान दर्जा देत सरकारने महिलांचे लग्नाचे किमान वय १८ वरून २१ वर्षे करण्याबाबत संसदेत विधेयकही मांडले. मुद्रा योजनेच्या माध्यमातून देशातील माता-भगिनींच्या उद्योजकतेला आणि कौशल्यांना प्रोत्साहन दिले. 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' उपक्रमाचे अनेक सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलींच्या संख्येत वाढ झाली आहे. २०१४ च्या तुलनेत धोरणात्मक निर्णय आणि सरकारच्या प्रोत्साहनामुळे विविध पोलीस दलांमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या दुपटीने वाढली आहे. असंही निर्मला सीतारामन यांनी यावेळी सांगितलं.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सकाळी ११ वाजता संसदेत अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली. त्यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच जगभरात सुरु असलेल्या कोरोना महामारीचा उल्लेख केला. या महामारीच्या काळातही देश आपली विकास यात्रा कायम ठेवेल, अशी अपेक्षा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केली आहे.