बीकेसी परिसरातील उड्डाणपूल कोसळला...आठ ते दहा मजूर हे पूलासोबतच खाली कोसळल्याची शक्यता...
मुंबईच्या बीकेसी परिसरातील उड्डाणपूल कोसळल्याची दुर्घटना आज पहाटे घडली. उड्डाणपूलाचे काम सुरु असल्याने नेहमीप्रमाणे काही मजूर पूलावर होते. दरम्यान पहाटे चार वाजण्याच्या सुमारास उड्डाणपूल अचानक हा कोसळण्यास सुरुवात झाली. यावेळी या पूलावर जवळपास 20 ते 25 मजूर काम करत होते. दरम्यान काही मजूरांना दुर्घटनेचा अंदाज आल्याने या मजूरांनी पूलावरुन वेळीच पळ काढला. मात्र, आठ ते दहा मजूर हे पूलासोबतच खाली कोसळल्याची माहिती समोर येत आहे. हे सर्व मजूर शेजारील नाल्यात पडल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी बचावकार्य सुरु करत जखमींना नाल्यातून बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या कोणीही पूलाच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती नाही. दरम्यान उड्डाणपूलाचा हा गर्डर कसा कोसळला हे मात्र अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र, यावरुन आता पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेतील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारण तापण्याची शक्यता आहे.