अवैध दारू बंद करण्याच्या मागणीसाठी अनकेदा महिला रस्त्यावरून आंदोलन करत असताना अनेकदा आपण पाहतो, पण बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील चांगेफळ गावातील महिलांनी अचानक दारू विक्रीचा बाजार भरवला असल्याने सर्वांना धक्काच बसला आहे. पण दारूचा हा बाजार एक आंदोलनाचा भाग आहे.
गावात अवैध दारू विक्री वाढल्याने गावातील अनेक कुटुंबात वाद होत आहेत, त्यात सध्या शाळा बंद असल्याने लहान मूल घरीच असल्याने दारुड्यांचे संस्कार लहान मुलांवर पडतात यामुळे गावातील अनेक लहान शाळकरी मुले सुद्धा दारूच्या व्यसनाधीन झालीत. अनेकदा पोलिसात तक्रार करूनही काही फायदा होत नसल्याने गावातील महिलांनी दारु विक्रीचा बाजार भरवून आंदोलन केलंय.
जो पर्यंत गावातील अवैध दारू विक्री बंद होत नाही तो पर्यंत गावातील सर्व महिला दारू अशीच बिनधास्त पणे विक्री करणार असल्याचा पवित्रा महिलांनी घेतलाय..चांगेफळ हे आदिवासी बहुल गाव असून या परिसरात अनेक अवैध दारू बनविण्याचे कारखाने बिनधास्तपणे सुरू असल्याचे व्हिडीओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र पोलीस कोणतीच कारवाई करत नसल्याने गावातील महिला आक्रमक झाल्या असून, त्यांनी आता सर्रास दारू विक्री करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे आता दारू विक्री संदर्भात पोलीस काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे..