आपण दरवर्षी एखाद्या तारखेला, म्हणजेच वर्षातून एकदा आपल्या आईचा, बहिणीचा, पत्नीचा, मैत्रिणीचा वाढदिवस करतो. त्यादिवशी तिच्यासाठी केक भेटवस्तु सगळे काही तिच्या आवडीचे करतो. हे सर्व खरंच आपण त्या प्रेमळ वात्सल्य मूर्तीसाठीच करतो कि तो दिवस संपल्यानंतर पुन्हा ३६५ दिवस तिला कुठले ना कुठले नातेरुपी धान्य बनुन चक्कीत रगडण्याचे असते. बहुतेक एक दिवस हॅपी बर्थडे करून ३६५ दिवस दुःखाच्या चक्कीत रगडण्यासाठी तिला ताकद दिली जात असावी. हे झाले कौंटुबिक स्तरावरचे स्त्रीजीवन, मग स्त्री ही कुटुबात आनंदी आहे का ?, सुरक्षित आहे का ? हे महत्वाचे. प्रत्येक कुटुंबातील महिला सुरक्षित असेल तिला, मानाची वागणूक मिळत असेल तरच घरात केलेला वाढदिवस आणि जगाने दिलेल्या जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा सुखदायी ठरेल.
८ मार्च जगभर जागतिक महिलादिन या नावाने साजरा होतो. या निमित्ताने अनेक ठिकाणी मोठ्मोठे कार्यक्रम आयोजित केले जातात. महिला सुरक्षितता, महिला सशक्तिकरण, महिलांचा शारीरीक, मानसिक, आर्थिक, सामाजिक विकास, महिला शिक्षा अभियान असे मोठमोठे कार्यक्रम होतात. आपल्या देशातील प्रत्येक महिला सुरक्षित आहे का हे पाहणे गरजेचे आहे. महिलांची सुरक्षा हा विषय आपल्या देशाच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे. आपल्या देशातील प्रत्येक महिला ही सुरक्षितच असली पाहिजे, पण तसे होत नाही. अनेक ठिकाणी महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण वाढतच आहे. आज देशात महिला सर्व क्षेत्रात प्रगती करत आहे परंतु मुली-महिला यांच्याबद्दल त्यांची विचारधारणा मागासलेली आहे. आपल्या देशात महिलांना लक्ष्मीचा दर्जा दिला जातो. पण आज कित्येक घरांमध्ये ती लक्ष्मी जेव्हा कमवुन आणेल तेव्हाच तिला मान मिळतो नाहीतर अपमानाशिवाय तिच्या पदरी काहीच पडत नाही.
महिला सुरक्षित असली तर हे पूर्ण विश्व बदलवण्याची ताकद तिच्यात आहे. महिला सुरक्षित असेल तेव्हाच ती कुटुंब, समाज घडवू शकते. महिला सुरक्षित असणे म्हणजेच ती निर्भय असणे, कुणाच्याही सानिध्या शिवाय जगणे, स्वतःचे निर्णय घेणे, आपण पुरुषांपेक्षा कमी नाही हे समजणे म्हणजेच महिला सुरक्षित होणे.
आपल्या देशात प्रत्येक महिला शिक्षित असायलाच पाहिजे, तरच ज्योतीबा व सावित्री फुले यांचा संघर्ष सार्थक झाल्यासारखा होईल. पुरुषांचे शिक्षण पूर्ण करून करियर घडल्यावर लग्न केले जाते तसेच महिलांच्या बाबतीत असल्यास पाहिजे तिचे शिक्षण, नोकरी हे सगळे झाल्यावरच तिचा लग्नाचा निर्णय घेतला पाहिजे, म्हणजे महिला सक्षम झाली तर ती पुरुषप्रधान संस्कृतीला बळी पडत नाही. आजची स्त्री अबला नसून सबला आहे. आज स्त्री चंद्रावर जाते, विज्ञान क्षेत्रात मोलाचे योगदान देते. स्त्री वैमानिक आहे, सैन्यदलात आहे. आजही ती माऊली पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करते असे कोणतेही क्षेत्र नाही ज्यात महिला तिचा यशाचा झेंडा रोवत नाही. पुरुषांपेक्षा चार पावले यश मिळवण्यात पुढेच आहे. अगदी दहावीच्या बोर्ड परीक्षांच्या निकालातसुद्धा मुलींचाच निकाल जास्त लागतो. तरीही जगात स्त्रीकडे मागासलेल्या विचारांनीच पाहिले जाते. नेहमी तिच्या सन्मानाची अवहेलना होते. स्त्री ही नेहमी स्वतःला सिद्ध करत असते. स्वतःला सिद्ध करून करून आज स्त्रीने प्रत्येक क्षेत्रात गगनभरारी घेतली आहे. सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा जो वारसा दिला आहे तो स्त्री मानाने चालवत आहे.
स्त्रीला समाजाकडून जास्त काही नको तिला फक्त मानाची वागणूक पाहिजे असते. तिला मानाने जगू द्या. तिला मानाने जगू दिले तर ती देशाचा मान वाढविण्याची ताकद निर्माण करू शकते.
आंतरराष्ट्रीय महिला दिन ८ मार्च रोजी साजरा केला जाणारा एक मोठा दिवस आहे. महिला हक्क चळवळीतील केंद्रबिंदू म्हणून हा दिवस पाळला जातो. हा दिवस लिंग समानता, पुरुत्पादक हक्क आणि महिलांवरील हिंसा आणि अत्याचार यासारख्या मुद्यांवर लक्ष केंद्रीत करतो. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त जगभरात मोर्चे, चर्चा, मैफिली, प्रदर्शन आणि वादविवाद आसे हजारो कार्यक्रम होतात. २०२४ मध्ये फ्रान्समध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी फ्रान्सच्या राज्यघटनेत गर्भपाताचे अधिकार समाविष्ट करण्यात आले होते. आपल्या देशात स्त्रीभ्रूण हत्या थांबविण्याचे कार्य जोरात चालू आहे. कारण स्त्रीया आता अबला नाही तर सबला आहे, त्या दुसऱ्यांचे ओझं नाही तर दुसऱ्यांचे ओझं स्वतः उचलण्याची ताकद ठेवतात. स्त्रियांना कायदेशीर संरक्षण मिळायलाच पाहिजे. सर्व सेवांमध्ये महिलांना प्रवेश दिला पाहिजे. स्त्रियांना पुरुषांबरोबरीचे वेतन मिळालेच पाहिजे.
जसे आपण महिलांच्या शारिरीक, आर्थिक, कौटुंबिक, सामाजिक विकासासाठी विचार करतो, त्याप्रमाणे तिच्या मानसिक विकासाचा देखील विचार केला पाहिजे. ती मानसिकदृष्ट्या सक्षम होणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी स्त्रियांचा आहार सात्वीक, पौष्टीक असला पाहिजे. स्त्रियांनी नियमित व्यायाम, मनोरंजन, निरनिराळे छंद जोपासणे, निरनिराळ्या उपक्रमांमध्ये सहभागी होणे, निरनिराळ्या वातावरणात फिरणे. ह्या सर्व गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. तेव्हाच हा आपला आंतरराष्ट्रीय महिला दिन खऱ्या अर्थाने साजरा झाल्यासारखा होईल.
हे जगाचा उद्धार करणारी नारीशक्ती तुझ्यासाठी काही काव्यात्मक मांडावेसे वाटले, जेणे करून तुझे बळ अजून लाखोपट वाढेल;
सोचना की कहां से कहां तक तुमने खुद को लाया है,
सफर यहां तक का इस पल तक का क्या आसान रहा है,
चलते विश्वरते इतना ही नहीं, रोते गिरते भी तुमने खुद को देखा है,
हर हार के बाद, तुमने जितना भी तो सीखा है,
'तुम, तुम कौन हो' ये हमेशा याद रखना
खुद कि खुशियों की चाबी किसी और को मत थमाना
अंत में तुमसे इतना ही कहना चाहूंगी कि,
तुम्हारी जीवन सरिता के तुम खुद साहिल बनना।
- लेखिका- मंगला रविंद्र शिरोळे