दिल्ली, गुजरात, महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये H3N2 विषाणूचा धोका वाढला आहे. या विषाणूमुळे देशात आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर या विषाणूचा सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रात झाला आहे. आतापर्यंत येथे विषाणूची 352 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. बीएमसीच्या म्हणण्यानुसार, मुंबईत 32 रुग्ण दाखल आहेत, त्यापैकी 4 H3N2 आणि 28 H1N1 रुग्ण आहेत. या सर्व रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर आहे. राज्यात इन्फ्लूएंझा H3N2 चा धोका लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्रात या विषाणूमुळे दोन जणांचा मृत्यू..
मीडिया रिपोर्ट्सनुसार,पहिला मृत्यू अहमदनगरमध्ये एमबीबीएस शिकणाऱ्या 23 वर्षीय वैद्यकीय विद्यार्थ्याचा आणि दुसरा नागपूरमध्ये झाला. देशात H3N2 इन्फ्लूएंझा वाढत आहे. राज्यातही या आजाराची साथ पसरली असून अनेकांना सर्दी-खोकल्याचा त्रास होत आहे. या विषाणूची लक्षणे कोरोना सारखीच असल्याने अधिक चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, एमबीबीएसची विद्यार्थी फिरायला बाहेर पडला. तेथून आल्यानंतर त्यांला कोरोनाची लागण झाली. तसेच, त्याला H3N2 ची लागण झाल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. दुसरी घटना नागपुरात घडली आहे. नागपुरात ७५ वर्षीय व्यक्तीचा H3N2 मुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्यात H3N2 मुळे आतापर्यंत २ मृत्यू झाले असून संपूर्ण देशभरात या विषाणूमुळे चारजणांचा जीव गेला आहे.
79% इन्फ्लूएंझा नमुन्यांमध्ये H3N2 विषाणू आढळले..
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अहवाल दिला आहे की, प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या इन्फ्लूएंझा नमुन्यांपैकी सुमारे 79% मध्ये H3N2 विषाणू आढळले आहेत. यानंतर, इन्फ्लूएन्झा बी व्हिक्टोरिया विषाणू 14% नमुन्यांमध्ये आढळले आहेत आणि इन्फ्लूएंझा ए H1N1 विषाणू 7% मध्ये आढळले आहेत. H1N1 स्वाइन फ्लू असेही म्हणतात. मंत्रालयाचे म्हणणे आहे की मार्चच्या अखेरीस H3N2 विषाणूची प्रकरणे कमी होऊ लागतील.