शेतकऱ्याची मुलगी झाली अधिकारी
ग्रामीण भागात शिक्षण घेऊन आपल्या जिद्द आणि आत्मविश्वसाच्या जोरावर शेतकऱ्यांची मुलगी बनली अधिकारी..
स्पर्धा परीक्षेची अभ्यास करण्यासाठी आता अनेक मुलं-मुली रात्रीचा दिवस करून परिश्रम करत असतात. यामध्ये अनेकजण आपलं गाव, घरदार सोडून शहराच्या ठिकाणी जाऊन अभ्यास करतात तर बरेच विद्यार्थी हे गावात राहून आपला कामाचा व्याप सांभाळून अभ्यास करतात. या सगळ्या प्रकियेत मुलींचा सहभाग देखील मोठा आहे. स्पर्धा परीक्षेत आज अनेक मुलींनी बाजी मारली आहे. आता अशाच एका हुनरबाज मुलीची यशोगाथा पाहणार आहोत.
सोलापूर जिल्यातील कुगाव येथील शेतकऱ्याची मुलगी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे. सारिका नारायण मारकड असे या मुलीचे नाव आहे. कठोर परिश्रम घेत तीने आईचे स्वप्न पूर्ण केले आहे. सारिका मारकड यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली असुन ग्रामीण भागात शिक्षण घेऊन प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल आता त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे.
सारिका मारकड यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण चिखलठाण येथील रामबाई बाबूलाल सुराणा विद्यालयात तर करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये महाविद्यालयीन शिक्षण झाले. त्यानंतर त्यांनी पुणे येथे डीएड पुर्ण कले. शिक्षक होण्याची त्यांची इच्छा होती. मात्र डीएड करत असताना स्पर्धा परीक्षेविषयी माहिती मिळाली आणि प्रशासकीय सेवेत दाखल व्हावे असे वाटू लागले. मग त्यांनी मुक्त विद्यापीठातून राज्यशास्त्र विषयात पदवी संपादन केली. आणि कोल्हापूर येथे स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी जाण्याचा निर्णय घेतला. एकत्र कुटुंब पद्धतीत त्या रहात होत्या. घरच्या काही लोकांचा पुढील शिक्षणास विरोध होता. आपल्या मुलीने खुप शिकावे अशी आईची इच्छा होती. घरच्या मंडळींची इच्छा नसताना त्यांनी कोल्हापूर येथे जाऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला.
2018 मध्ये त्यांना पहिल्या प्रयत्नात यशाने थोडक्यात हुलकावणी दिली. त्यानंतर मात्र मनात नैराश्य आले. मग त्या स्पर्धा परिक्षेचा अभ्यास सोडून गावाकडे आल्या. घरी आल्यावर आईंने त्यांना समजावले आणि पुन्हा प्रयत्न करण्याची प्रेरणा दिली. एक वर्षानंतर पुन्हा पुणे येथे इंग्रजी विषयाचे तास लावले व जोमाने तयारी सुरू केली.
त्यानंतर मग जिद्द, चिकाटी आणि परिश्रमातून त्यांनी यश हे खेचून आणलेच. पोलिस उपनिरीक्षक परिक्षेत 35 वी रॅंक मिळवून यश मिळाले आहे. घरात वडील अशिक्षित, चुलते व इतरांचेही फारशे शिक्षण झालेले नाही. जवळचे कोणी मार्गदर्शन करणारे नसताना दवखील हे यश मिळाल्याने त्यांच्या आई- वडीलांना खुप आनंद झाला आहे. या यशाबद्दल त्यांचा सर्वत्र सन्मान केला जात आहे.
पोलिस प्रशासकीय सेवेत दाखल झाल्यानंतर ग्रामीण भागातील शिक्षणाची अडचणीत असणार्या विद्यार्थ्यांना मदत करण्याचा आपला नेहमी प्रयत्न राहील असे सारिका सांगते. त्याचबरोबर क्षमता असतानाही ग्रामीण भागातील मुली शिक्षणापासून वंचीत रहात आहेत. पालकांनी मुलांबरोबरच मुलींनाही शिकवले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली तिने व्यक्त केली आहे.