एकतर्फी प्रेमातून मुलीचा भरदिवसा चाकूने गळा चिरून निर्घृण खून

Update: 2021-09-23 16:03 GMT

अल्पवयीन मुलीचा एकतर्फी प्रेमातून प्रियकराने भरदिवसा चाकूने गळा चिरुन निर्घृणपणे खून केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडल्याने एकच खळबळ उडाली. चैतन्या बाळू बंडलकर (वय १७ रा. वाठार, किरोली) असे खून झालेल्या युवतीचे नाव आहे. तर अनिकेत मोरे (वय २२, रा. शिंरबे, ता. कोरेगाव) असे खून करणाऱ्या युवकाचे नाव आहे. खुनानंतर अनिकेत हा मल्हारपेठ पोलिसांत जावून हजर झाला असून त्याने गुन्हा कबूल केला आहे.




 


खुनाची बातमी सर्वत्र पसरताच चाफळ व परिसरातील लोकांनी धाव घेतल्याने घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चाफळ येथील पोतदार यांच्या मालकीच्या घरात चाहुरवाडी शाळेत कार्यरत असलेल्या नंदा पाटोळे बंडलकर या शिक्षिका मुलींसह भाडेतत्वावर राहतात. गुरुवार दि 23 रोजी शिक्षिका पाटोळे शाळेमध्ये गेल्या होत्या. यावेळी घरात मुलगी चैतन्या ही एकटीच होती. यावेळी दुपारी घरी आलेल्या अनिकेतने धारदार चाकूच्या साह्याने तिचा गळा चिरुन निर्घृणपणे खून केला. संशयित अनिकेतचे चैतन्यावर एकतर्फी प्रेम होते. त्यातून तो तीला भेटायला येत होता. अनिकेतने काही दिवसापूर्वीच चैतन्याच्या आईची भेट घेवून लग्नासाठी मागणी केली होती. अनिकेत गुरुवारी दुचाकीवरून चाफळला आला होता. यावेळी घरात त्यांच्यात काही बोलणे होण्यापूर्वीच त्याने चाकूने तीचा गळा चिरला. त्यात ती जागीच ठार झाली. खुनाची माहिती कळताच कराडचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ रणजित पाटील, पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. अधिक तपास चाफळ पोलीस दुरक्षेत्राचे फौजदार अजित पाटील करीत आहेत.




 



Tags:    

Similar News