'मिशन वात्सल्य' मोहिमेच्या माध्यमातून 10 हजार विधवा महिलांपर्यंत मदतीसाठी पोहचलं प्रशासन...
कोरोना काळात आपला नवरा गमावलेल्या महिलांना मदत व त्यांना लागणारे प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी तसेच 18 विविध सेवांचा महिला आणि बाल विकास विभागामार्फत कशा पद्धतीने लाभ देता येईल याबाबत 'वात्सल्य मिशन' अंतर्गत कामस सुरवात;
कोविड काळामध्ये ग्रामीण भागातील तसेच उपेक्षित वंचित घटकातील अनेक महिलांना अकाली वैधव्य आले. त्यामुळे त्यांच्या जगण्याचाच प्रश्न निर्माण झाला अशा काळात या महिलांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी 'मिशन वात्सल्य' मोहिमेच्या अंतर्गत मदत केली जात असल्याची माहिती राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री ॲड यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.
राज्यात गेल्या दीड वर्षात ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी कोविंडमुळे महिलांना अचानक वैधव्याला सामोरे जावे लागले आहे. कोविड १९ मुळे मार्च २०२० नंतर विधवा झालेल्या महिलांची एकूण संख्या : 15 लाख 95 हजार इतकी आहे. त्यापैकी जिल्हा कृती दलाकडे यादी तयार असलेल्या महिलांची संख्या 14 लाख 661 आहे. अशा महिलांना मदत करण्यासाठी तसेच त्यांना लागणारी प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी 18 विविध सेवा देण्याचा प्रयत्न महिला आणि बाल विकास विभागामार्फत सुरू आहे. यामध्ये संजय गांधी निराधार योजने पासून अनेक योजनांचा समावेश आहे मुख्य म्हणजे ग्रामीण भागातील या महिलांसाठी घरकुल योजनेतही कशा पद्धतीने लाभ देता येईल याबाबत या वात्सल्य मिशन अंतर्गत काम सुरू असल्याचेही ठाकूर यांनी सांगितले.
यासाठी महिला आणि बाल विकास विभागाचे कर्मचारी बाल विकास प्रकल्प अधिकारी स्थानिक युनिट अधिकारी आणि कर्मचारी तसेच अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून अशा महिलांच्या घरोघरी जाऊन त्यांना या सेवांचा लाभ दिला जात आहे. त्याबाबतची माहितीही दिली जात आहे. आतापर्यंत राज्यात सुमारे साडेदहा हजार महिलांपर्यंत विभाग पोहोचला असून लवकरच त्यांना विविध लाभ मिळतील असा विश्वास ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.
या मोहिमेअंतर्गत विभागाने दाखल करून घेतलेल्या अर्जांची संख्या पुढील प्रमाणे आहे.
संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी 8 हजार 661 महिलांकडून अर्ज दाखल करून घेतले आहेत. श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या लाभासाठी 405 अर्ज दाखल झाले आहेत. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेसाठी 71 अर्ज भरून घेण्यात आले आहेत. इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेचा लाभ मिळावा यासाठी बारा हजार नऊ महिलांकडून अर्ज दाखल करून घेण्यात आले आहेत. इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजनेसाठी केवळ तीन अर्ज विभागाकडे आले आहेत या सर्व अर्जांची एकूण संख्या पाहता वात्सल्य मिशन योजनेअंतर्गत आतापर्यंत 10 हजार 349 महिलांशी प्रत्यक्ष संपर्क साधून त्यांच्याकडून अर्ज दाखल करून घेण्यात आले आहेत.