सध्या राज्याच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ऑफर केलेल्या लाचेची जोरदार चर्चा आहे. काल सभागृहात सुद्धा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अमृता फडणवीस यांच्या संदर्भात जे काही घडलं त्या संपूर्ण घटनेचा घटनाक्रम सांगितला. अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी मलबार हिल पोलीस ठाण्यात गुन्हा देखील नोंद केला असून संशयित आरोपी अनिक्षाला अटक करण्यात आली आहे. आता या संपूर्ण प्रकारावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या थेट राजीनाम्याची मागणी केली आहे.
या संपूर्ण प्रकाराबाबत सुषमा अंधारे यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटल आहे की, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चौकशी चालू असताना निष्पक्ष चौकशी व्हावी या हेतूने नैतिकता म्हणून पदाचा राजीनामा दिला होता. आता जर विद्यमान गृहमंत्र्यांच्या पत्नीच्या संदर्भात चौकशी चालू असेल तर अशीच नैतिकता दाखवत देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यायलाच हवा. असं ट्विट करत सुषमा अंधारे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची प्रतही सोबत जोडली आहे.
माजी गृहमंत्री @AnilDeshmukhNCP यांनी चौकशी चालू असताना निष्पक्ष चौकशी व्हावी या हेतूने नैतिकता म्हणून पदाचा राजीनामा दिला होता. आत्ता जर विद्यमान गृहमंत्र्याच्या पत्नीच्या संदर्भात चौकशी चालू असेल तर अशीच नैतिकता दाखवत @Dev_Fadnavis यांनी राजीनामा द्यायलाच हवा.@ShivsenaUBTComm pic.twitter.com/Wwgt577j96
— SushmaTai Andhare (@andharesushama) March 17, 2023
नक्की प्रकरण काय आहे?
अनिष्का या फॅशन डिझायनर आहेत. मागील 16 महिन्यांपूर्वी त्या अमृता फडणवीस यांच्या संपर्कात आल्या. आपण डिझाईन केलेले कपडे अमृता फडणवीस यांनी वेगवेगळ्या इव्हेंट मध्ये घालावेत म्हणून ती अमृता फडणवीस यांच्या संपर्कात आली. 2021 मध्ये अनिष्काने तिच्या आईचं निधन झाल्यानंतर तिने एकटीने संपूर्ण घराची जबाबदारी एकटीने संभाळल्याचे अमृता फडणवीस यांना सांगितलं होतं. या पहिल्या भेटीनंतर अनिष्का ही नंतर अमृता फडणवीस यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी किंवा ऑफिसमध्ये जात असे. उपमुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या सागर बंगल्यावरही ती येत होती. या काळात तिने अमृता फडणवीस यांना काही कार्यक्रमात ड्रेस आणि ज्वेलरी परिधान करण्यासाठी दिली होती. त्यानंतर अनिष्काने अमृता फडणवीस यांच्याकडे काही बुकिंग विषयी माहिती देखील मागितली होती आणि या बदल्यात त्यांना ती एक कोटी रुपये द्यायला तयार होती. इतकाच नाही तर वडिलांना एका गुन्हेगारी प्रकरणातून सोडवण्यासाठी देखील तिने अमृता फडणवीस यांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याचं समोर येत आहे.