राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांचा एक फोटो सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे. संसद आवारात निलंबनाच्या विरोधात आंदोलनाला बसलेल्या १२ खासदारांना भेटून आल्यानंतर सुप्रिया सुळेंनी आपल्या नेहमीच्या स्टाइल ने सेल्फी घेतला. सुप्रिया सुळे सेल्फी घेत असल्याचा फोटो ही अनेक प्रसार माध्यमांनी घेतला. या फोटोमध्ये सुप्रिया सुळेंच्या फोन ला शरद पवारांचा ऐतिहासिक फोटो असल्याचं दिसतंय.
भारतीय जनता पक्षाच्या मजबूत प्रचाराच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणुकीच्या दरम्यान जोरदार प्रचार केला होता. शरद पवारांनी या प्रचारात आपला सर्व अनुभव पणाला लावला होता. अशातच सातारा येथील एका सभेला संबोधित करत असताना पाऊस पडला आणि भिजता भिजताच शरद पवारांनी आपलं भाषण सुरू ठेवलं.
शरद पवारांचं ते पावसातलं भाषण ऐतिहासिक ठरलं, आणि निवडणुकांच्या प्रचारात विरोधी पक्षाची एन्ट्री झाली. ८० वर्षाचा योद्धा पावसात भिजला असं या घटनेचं वर्णन केलं गेलं. शरद पवारांचा पावसातला तो फोटो आणि व्हिडीयो प्रचंड व्हायरल झाला. त्यानंतर पावसात भिजण्याचा निवडणुकांतील यशाशी संबंध जोडण्याची अंधश्रद्धा ही सुरू झाली.
जो बायडेन पासून देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांपर्यंत भिजण्याचा हा इतिहास आला आहे. मात्र शरद पवारांच्या फोटो इतकं ऐतिहासिक महत्व इतर कुठल्या ही फोटोला मिळू शकलं नव्हतं.
आज सुप्रिया सुळेंच्या फोन च्या कव्हर मुळे शरद पवारांच्या ( Sharad Pawar ) या ऐतिहासिक सभेची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.