अनेक महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर राज्य महिला आयोगाला रुपाली चाकणकर यांच्या रूपाने नवनिर्वाचित अध्यक्ष मिळाल्या. यानंतर आज मंगळवारी पुण्यातील येरवडा महिला कारागृहाचा त्यांनी दौरा केला. त्यांनी कारागृहाला भेट देऊन तेथील महिलांशी संवाद साधला.
या दौऱ्यात त्यांनी महिला कारागृहातील जेवणाची व्यवस्था, तेथील स्वच्छतागृह, आरोग्य विभाग यांची माहिती घेतली.
महिला कैद्यांच्या प्रमाणानुसार वैद्यकीय सेवा अत्यंत अपुरी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. अपुरी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य महिला आयोग प्रयत्न करेल अशी ग्वाही त्यांनी उपस्थित महिलांना आणि पोलीस प्रशासनाला दिली. याशिवाय कारागृहातील महिला कैद्यांसाठी तयार होत असलेल्या जेवणाची चवदेखील चाकणकर यांनी यावेळी घेतली.