Rupali Chakankar | विरोधकांकडे कोणतेही मुद्दे नसल्याने वारंवार पातळी सोडून टीका होतेय
“विरोधकांकडे कोणतेही मुद्दे नाहीत. म्हणून सातत्याने पातळी सोडून वारंवार टीका केली जातेय, अशी प्रतिक्रिया राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी दिलीये.;
कोव्हिड १९ मुळे राज्यभरामध्ये बालविवाहांचं प्रमाण वाढलेलं आहे. याचसंदर्भात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी कोल्हापूरच्या पोलिस अधिक्षक कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी माध्यमांशी बोलताना, "विरोधकांकडे आरोपांसाठी कोणतेही मुद्दे नाहीत म्हणून खालच्या पातळीवर जाउन टीका केली जात आहे असं त्य़ा म्हणाल्या.
कोव्हिड काळात किती आणि कसं चांगलं काम केलं जाऊ शकतं हे महाविकास आघाडीच्या सरकारनं दाखवून दिलं. त्यामुळे विरोधकांकडे आरोप करण्यासाठी कोणतेही मुद्दे शिल्लक नाहीत. म्हणूनच खालच्या पातळीवर जाऊन वारंवार पवार साहेबांवर टीका केली जातेय, अशी प्रतिक्रिया राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली.
त्या पुढे म्हणाल्या, की "कोणतेही पुरावे हातात नसताना विरोधक सातत्याने टीका करत सुटले आहेत. त्यांच्या मानसिक नैराश्येचं हे मोठं लक्षण आहे. मविआ सरकार काम करत असताना त्यांना जनतेनेही साथ दिली. विरोधकांना नेमकं हेच सहन होत नाहीये. त्यामुळे हाती काहीच नसताना मुद्दाम टीका करायची आणि जनतेमध्ये संभ्रम निर्माण करायचा असा कार्यक्रम सुरू असल्याची टीका त्यांनी विरोधकांवर केली. बालविवाहाच्या मुद्द्यावरही त्यांनी मत व्यक्त केलंय.
"शिवाय राज्यभरात बालविवाहाचं प्रमाण वाढले आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे आलेली परिस्थिती याला कारणीभूत आहे. बालविवाह लावुन देणाऱ्या पालकांबरोबरच आता ग्रामपंचायत सदस्यांवरही बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ अनुसार आता कारवाई केली जाणार आहे. या कारवाईमध्ये त्यांचे सदस्यत्व आणि पद रद्द करण्याची मागणी राज्य महिला आयोगामार्फत राज्य शासनाकडे केली जाणार आहे", असंही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.