पंकजा मुंडे यांच्या भाषणाचा उल्लेख करत 'सामना'च्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा...

Update: 2021-10-18 05:45 GMT

शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून भाजपवर जोरदार हल्ला करण्यात आला आहे. आजच्या 'सामना'च्या अग्रलेखातून पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणाचा उल्लेख करत भाजपवर निशाणा साधला आहे.

पंकजा यांनी दसरा मेळाव्यात बोलताना

'सरकार पडणार की नाही, यावरच सगळे अडकले आहेत. विरोधी पक्ष सरकार पडण्याचे रोज मुहूर्त देत आहे तर सत्ताधारी सरकार पडणार नाही, असे सांगत आहेत. हे किती दिवस चालणार. आता तरी यातून बाहेर पडा. असा सल्ला राज्यातील भाजप नेत्यांना दिला होता. यावरुन आजच्या सामनातून भाजपमध्ये उपऱ्यांचे व व्यापाऱ्यांचे राज्य सुरू झाले आहे, असं म्हणत पंकजा मुंडे यांच्या भाषणाचा उल्लेख करत फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.


काय म्हटलंय आजच्या सामनात?

खरे तर फडणवीसांचे मुख्यमंत्रीपद कसे गेले हेच त्यांना अजून समजू शकलेले नाही. त्यामुळे फडणवीस किंवा पाटील जे बोलतात ते किती गांभीर्याने घ्यायचे? हा प्रश्नच आहे. सरकार पाडण्याच्या तारखा देणे बंद करा व कामाला लागा, असे पंकजा मुंडे यांनी दसऱ्याच्या दिवशीच भगवानगडावरून सांगितले. पंकजा बोलल्या तेच भाजपचे अंतस्थ मतप्रवाह असावेत, पण भाजपमध्ये लोकशाहीला स्थान उरले नसल्याने पक्षासाठी खस्ता खाणाऱ्यांच्या मतास किंमत उरलेली नाही. भाजपमध्ये उपऱ्यांचे व व्यापाऱ्यांचे राज्य सुरू झाले आहे.

अशा शब्दात फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांचा समाचार घेतला आहे...

कमी प्रतीचा गांजा मारल्याने असं होतंय...

भाजप व त्यांचे केंद्रातले सरकार कोणत्याही प्रश्नांना सामोरे जात नाहीत. प्रश्न विचारणाऱ्यांना ते खतम करतात. लोकशाही, घटना, कायदा त्यांना मान्य नाही. विरोधी पक्षाचे मुख्यमंत्री ते स्वीकारत नाहीत. राजकारणाचा हा नवा 'पदर' बरेच काही सांगून जातो. कमी प्रतीचा गांजा मारल्यानेच या कल्पना त्यांना सुचत असाव्यात.

दसरा मेळावा, त्यातील उद्धव ठाकरे यांचे भाषण वाया गेले नाही. ठाकरे यांच्या भाषणामुळे विरोधकांना चिलमीत जास्तीचा गांजा भरून 'दम मारो दम' करावे लागले. त्यांच्या चिलमीतला गांजा कमी प्रतीचा होता हे त्यांच्या बेताल बडबडण्यावरून स्पष्ट होते.

अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह देवेंद्र फडणवीस आणि केंद्र सरकारवर आजच्या सामनातून निशाणा साधला आहे.

काय म्हटलंय आजच्या सामनात?

आक्षेप घेणारे फडणवीस किंवा चंद्रकांत पाटील कोण?

मेळाव्यातील शिवसेना पक्षप्रमुखांचे भाषण परंपरेप्रमाणे गाजले आहे. श्री. उद्धव ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री अशा दोन वेगळय़ा भूमिकेत आहेत, पण दसरा मेळावा हा शिवसेनेचा असतो व शिवसेना पक्षप्रमुख मेळाव्यात आपले विचार मांडत असतात. भारतीय जनता पक्षाने ठाकरे यांच्या जोरदार भाषणावर बेंबीच्या देठापासून बोंबा मारायला सुरुवात केली आहे. श्री. फडणवीस यांनी तर ''उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेच कसे?'' अशी 'अलोकशाही' भूमिका घेऊन मनातली भडास बाहेर काढली. उद्धव ठाकरे यांनी एखाद्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री करू असे सांगितले होते, पण ते स्वतःच झाले, असा आक्षेप घेणारे श्री. फडणवीस किंवा चंद्रकांत पाटील कोण? उद्धव ठाकरे हे शिवसैनिक आहेत व ते काही परकीय देशातील राजकीय पक्षाचे सदस्य नाहीत. दुसरे असे की, उद्धव ठाकरे हे कोणत्या परिस्थितीत मुख्यमंत्री झाले याचा खुलासा श्री. शरद पवार यांनी केला आहे.

अशा शब्दात फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

कडय़ाकुलुपात शपथ घेतली नाही…

महाविकास आघाडीचे बहुमत झाले व त्यांनी आपला नेता निवडला. उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर लाखोंच्या उपस्थितीत वाजत गाजत शपथ घेतली. लोक झोपेत आणि गुंगीत असताना लपून छपून, कडय़ाकुलुपात शपथ घेतली नाही. हे काय राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांना माहीत नाही? त्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कसे झाले या मळमळीस तसा अर्थ नाही. श्री. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून तुमच्याच राज्यपालांनी शपथ दिली आहे व त्या घटनात्मक विधीस स्वतः श्री. फडणवीस उपस्थित होते.

असं म्हणत फडणवीस यांना रात्रीच्या शपथविधीची आठवण करुन दिली आहे.

केंद्र विरुद्ध राज्य...

केंद्र सरकारने राज्य सरकारांच्या हक्क आणि अधिकारांचे हनन चालवले आहे. राज्यांना काम करू द्यायचे नाही. विशेषतः ज्या राज्यांत भाजपचे मुख्यमंत्री नाहीत, तेथे तर केंद्रीय तपास यंत्रणांचा मुक्त हैदोस घातला जात आहे. भाजपकडून सीबीआय, ईडी, आयटी व एनसीबीचा वापर स्वतःची बटीक असल्यासारखा केला जात आहे. ईडी, सीबीआयच्या आडून जे 'शिखंडी' पद्धतीचे राजकारण हे लोक करीत आहेत, त्याचा बुरखाच ठाकरे यांनी फाडला. ''हिंमत असेल तर मर्दासारखे अंगावर या'' असा

आव्हानात्मक पवित्रा

ठाकरे घेतात तेव्हा भाजपने हे आव्हान स्वीकारण्याची मर्दानगी दाखवायला हवी. महाविकास आघाडीच्या मंत्र्यांवर, नेत्यांवर हल्ला करणे समजू शकतो, पण त्यांच्या कुटुंबाचाही छळ करून भाजपवाले स्वतःचा अमानुष चेहराच दाखवीत आहेत.

'पदरा' आडचे घाणेरडे राजकारण...

'पदरा'आडचे नवे घाणेरडे राजकारण सुरू आहे. पडद्यामागे पूर्वी बरेच काही घडत असे. आता पडद्याऐवजी 'पदरां'चा वापर भाजपने सुरू केला आहे. आपल्या देशात हे नवे पायंडे भाजपने पाडले आहेत.

भाजपने महाराष्ट्राची सत्ता गमावून दोन वर्षे झाली. त्या धक्क्यातून त्यांनी सावरायला हवे. जे घडले आहे ते स्वीकारून पुढे जायला हवे. राजकारणात हे असे चढ-उतार येतच असतात. सत्य स्वीकारले नाही तर निराशेचे आणि वैफल्याचे झटके येतात व लोक अमली पदार्थांच्या आहारी जातात.

भाजपचे लोक दसरा मेळाव्यानंतर ज्या बेधुंद पद्धतीने शिमगा करीत आहेत, बेताल आरोप करीत आहेत ते बरे नाही. हे लोक नशेत वगैरे बोलत आहेत काय त्याचा तपास व्हावा.

''एक आण्याचा गांजा मारला की, भरपूर कल्पना सुचतात'' असे एकदा लोकमान्य टिळक उपहासाने बोलले होते. आताही भाजप पुढाऱ्यांच्या तोंडून जी भन्नाट मुक्ताफळे व शिमगोत्सव सुरू आहे, त्यामागे लोकमान्यांनी जे 'गांजापुराण' सांगितले ते आहे काय?

एनसीबीच्या कारवायांवरुन निशाणा...

एनसीबीने या सगळय़ाचा तपास करायला हवा. वाटल्यास भानुशाली, गोसावी, फ्लेचर या 'भाजपाई' कार्यकर्त्यांना घेऊन धाडी घालाव्यात, हवे तसे पंचनामे करावेत, पण दसरा मेळाव्यानंतर भाजप नेते कोणत्या नशेत बोलत आहेत ते पाहावेच लागेल. महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने जनतेचा विश्वास आणि प्रतिष्ठा गमावली आहे.

'विश्वास गमावला' असे खरे तर एखाद्या सरकारविषयी बोलण्याची पद्धत आहे, पण महाराष्ट्रात गंगा उलटी वाहताना दिसत आहे. येथे विरोधी पक्षाचे रोजच हसे होत आहे. विरोधी पक्ष हा चेष्टेचा विषय बनला आहे व लोकशाहीसाठी हे चांगले लक्षण नाही.

केंद्रातील भाजप धुरिणांना 'विरोधी पक्ष', 'विरोधी सूर' या संसदीय लोकशाहीच्या संकल्पनाच मान्य नाहीत...

पण महाराष्ट्राला लोकशाहीची परंपरा आहे. त्यामुळे विरोधी पक्षाने त्यांचे काम निर्भयपणे करत राहावे या मताचे आम्ही आहोत. महाराष्ट्राला विरोधी पक्षनेत्यांची चांगली परंपरा आहे. भाई श्रीपाद अमृत डांगे, उद्धवराव पाटील, दत्ता पाटील, मनोहर जोशी, गोपीनाथ मुंडे, खडसे, शरद पवारसुद्धा विरोधी पक्षनेते होते. फक्त

बेछूट आणि बेफाम आरोप

करायचे

व सरकार पाडण्याच्या तारखांचा घोळ करायचा हेच विरोधी पक्षनेत्यांचे काम नसते.

सरकारचे जेवढे आयुष्य आहे, तेवढे आयुष्य सरकारला मिळणारच आहे. सरकारच्या आयुष्याची दोरी तुमच्या हातात नाही.

सरकार कधी गेले हे कळणारही नाही असे श्री. फडणवीस म्हणतात. यावर सामनामधून हा त्यांचा निव्वळ अहंकार आहे. असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

श्री. शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितले की, भाजपला सत्तेचा माज आला आहे. पवार यांनी वैयक्तिक टीका केली नाही. शेतकऱ्यांना ज्या प्रकारे चिरडले गेले त्यावरचा हा संताप आहे, पण भाजपच्या चंद्रकांत पाटील यांनी श्री. पवार यांचा उल्लेख 'एकेरी' भाषेत करून आपल्या डोक्यात कमी प्रतीचा गांजा असल्याचे दाखवून दिले.

प्रश्न विचारणाऱ्यांना खतम केलं जातं...

भाजप व त्यांचे केंद्रातले सरकार कोणत्याही प्रश्नांना सामोरे जात नाहीत. प्रश्न विचारणाऱ्यांना ते खतम करतात. लोकशाही, घटना, कायदा त्यांना मान्य नाही. विरोधी पक्षाचे मुख्यमंत्री ते स्वीकारत नाहीत. राजकारणाचा हा नवा 'पदर' बरेच काही सांगून जातो.

कमी प्रतीचा गांजा मारल्यानेच या कल्पना त्यांना सुचत असाव्यात. दसरा मेळावा, त्यातील उद्धव ठाकरे यांचे भाषण वाया गेले नाही. ठाकरे यांच्या भाषणामुळे विरोधकांना चिलमीत जास्तीचा गांजा भरून 'दम मारो दम' करावे लागले. त्यांच्या चिलमीतला गांजा कमी प्रतीचा होता हे त्यांच्या बेताल बडबडण्यावरून स्पष्ट होते.

अशा शब्दात आजच्या सामनातून भाजप चा समाचार घेण्यात आला आहे.

Tags:    

Similar News