"रमेश बोरनारे आमदार नाही नालायक माणूस आहे." पिडित जयश्री बोरनारेंनी व्यक्त केला संताप...

Update: 2022-02-20 12:54 GMT

औरंगाबाद तालुक्यातील सटाणा येथे केंद्रीय राज्य मंत्री भागवत कराड यांच्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवल्याने शिवसेना आमदार रमेश बोरनारे यांना आपल्या भावजयीला मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी राज्य महिला आयोगाने देखील पोलिसांकडून अहवाल मागितला आहे.

औरंगाबाद तालुक्यातील सटाणा येथे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांच्या हस्ते गुरुवारी भाजपा शाखेचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे यांच्या चुलत भावाची पत्नी जयश्री दिलीप बोरनारे या पतीसोबत हजर होत्या. त्यांनी डॉ. कराड व माजी नगराध्यक्ष डॉ दिनेश परदेशी यांचा सत्कार केला. हा सत्कार बोरनारे कुटुंबियांच्या जिव्हारी लागला. हा राग मनात धरून आमदार बोरनारे यांच्या कुटुंबियांनी भावजयीस लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करून जखमी केले. तसेच शिविगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली.

आमदार बोरनारे स्वतः या मारहाणीत सहभागी झाले होते. विशेष म्हणजे त्यांची भावजय गोदावरी कॉलनीत एका नातेवाईकांच्या श्राद्धाच्या कार्यक्रमात पती सोबत सहभागी झालेल्या होत्या. या भर कार्यक्रमातच त्यांना बोरनारे कुटुंबातील १० जणांनी जबर मारहाण केली. तसेच त्यांच्या पतीला देखील मारहाण करण्यात आली आहे. घटना घडल्यानंतर सदर महिलेने पोलीस ठाणे गाठले. पोलीसांनी त्यांना उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. उपचार केल्यानंतर त्यांनी पोलीस ठाणे गाठून आपली फिर्याद दिली. या प्रकरणी जयश्री बोरनारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आमदार रमेश बोरनारे, त्यांचा भाऊ संजय नानासाहेब बोरनारे, दिपक बाबासाहेब बोरनारे, अजिंक्य संपत बोरनारे, रणजीत मधुकर चव्हाण, संपत नानासाहेब बोरनारे, अबोली संजय बोरनारे, वर्षा संजय बोरनारे, संगिता रमेश बोरनारे, दिनेश शाहु बोरनारे या दहा जणांविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या शिवाय राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी देखील ट्विट करून या प्रकरणी अहवाल राज्य महिला आयोगाकडे सादर करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत.

Tags:    

Similar News