धनंजय मुंडेंमुळे शरद पवारांनी भेटीची दिलेली वेळ नाकारली, करूणा मुंडेंचा खुलासा
मॅक्सवुमन वर झालेल्या चर्चेत करूणा मुंडेंनी शरद पवारांनी भेट नाकारल्याबद्दलचा हा खुलासा केला.;
कोल्हापूर निवडणुकीत आर्थिक मदत न केल्याचे कारण देत करूणा मुंडे यांनी धनंजय मुंडेवर आरोपांची झडीच लावली आहे. यात त्यांनी फक्त धनंजय मुंडेंवरचे आरोपच नाही तर सुप्रिया सुळे आणि शरद पवारांबद्दलची खंत देखील बोलून दाखवली आहे. धनंजय मुंडेंमुळे शरद पवारांनी दिलेली भेटीची वेळ नाकारली असा आरोपच त्यांनी मॅक्स वुमन वर झालेल्या चर्चेत केला आहे.
कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीनंतर करूणा मुंडे विरूध्द धनंजय मुंडे हा वादानं पुन्हा डोकं वर काढलंय. कोल्हापूर निवडणुकीत पराभव झाल्यानंतर निवडणुकीत आर्थिक मदत न केल्याने करूणा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर आरोपांच्या फैरीच झाडल्या आहेत. मॅक्स वुमनवर रूपाली ठोंबरेंसोबत झालेल्या चर्चेत त्यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला.
नेमकं काय झालं होतं?
धनंजय मुंडेनी जेव्हा खोट्या केस मध्ये त्यांना अटक करायला लावली होती त्यावेळी सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांनी एकदा तरी आमची विचारपूस करायला हवी होती असं त्या म्हणतात. "मध्यंतरीच्या काळाच जेव्हा मुलांना धनंजय मुंडे जबरदस्तीने घेऊन गेले त्यावेळी ही या दोघांनी साधी विचारपूसही केली नाही.
सुप्रिया सुळे यांना भेटीसाठी चार ते पाच वेळेस फोन केले परंतू त्यांनी एकदाही फोन उचलले नाही. किंवा साधा कॉलबॅकही आला नाही. याशिवाय मी शरद पवारांना फोन केला तर त्यांच्या कडून मला दोन ते तीन फोन आले. हेच मी धनंजय मुंडेंना सांगितलं आणि त्यांनी पुढच्या काही मिनिटांत काय केलं काही माहित नाही पण पुढच्याच क्षणी पवारांनी भेट रद्द केल्याचा फोनच आला.", असं करूणा मुंडे चर्चेदरम्यान म्हणाल्या, त्यामुळे शरद पवार धनंजय मुंडेंचं ऐकून निर्णय घेतात का असा प्रश्न निर्माण झाला.
धनंजय मुंडेंनी सांगावं आणि शरद पवारांनी ऐकावं असं काही नाही - रूपाली ठोंबरे
यावर चर्चेत सहभागी झालेल्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी, "दुसरी बाजू मांडताना म्हटलं की अस काही नाहीये. धनंजय मुंडेंनी सांगावं आणि शरद पवारांनी ऐकावं असं कधी होत नसतं. कित्येकदा आम्हाला नेत्यांना सुध्दा अचानकपणे शरद पवारांसोबत ठरलेली भेट रद्द झाल्याचा फोन येतो. काही अति महत्वाच्या कामामुळेच ते ठरलेल्या बैठका रद्द करतात. शिवाय सुप्रिया सुळे या खासदार आहेत त्या देशाच्या राजकारणात सक्रीय आहेत. त्यामुळे त्यांनाही व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढणं जमत नसेल.", अशी प्रतिक्रीया दिली.