"अण्णा उभे रहा पवार साहेब आलेत, तुम्ही म्हणाल होतात आपण साधी माणसे आहोत. या कार्यक्रमाला एवढा मोठा मानून येणार नाही. पण आज शरद पवार आलेत." असं म्हणत राष्ट्रवादीच्या युवती अध्यक्षा सक्षणा सलगर यांना भर स्टेजवर अश्रू अनावर झाले.
उस्मानाबाद तालुक्यातील पाडोळी या ठिकाणी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद चंद्रजी पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी युवती सेलच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी मंजूर करून आणलेल्या विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी बोलताना सक्षणा सलगर यांनी नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली. मोदी, शहा आणि फडणवीस यांना लंगोट सुद्धा घालायचे समजत नाही अशा भल्याभल्याना मैदानात कोणी लोळवले असेल तर ते शरद पवार आहेत. शरद पवार यांचा राजकारणातील कार्यकाळ संपला असे हे लोक म्हणायचे, पण शेर बुढा भी होता है तो घास नहीं खाता. टाइगर अभी जिंदा है. असं म्हणत त्यांनी मोदी व शहा यांना टोला लगावला. धनंजय मुंडे, राजेश टोपे, हसन मुश्रीफ, जयंत पाटील, नवाब मलिक यांनी विकास कामांसाठी मोठा निधी उपलब्द करून दिला आहे. सध्या लोकांच्यात संभ्रम निर्माण करण्यासाठी नवाब मलिक यांच्यावर आरोप होत आहेत. अल्पसंख्याक माणसाला खिंडीत गाठण्याचे काम केले जात आहे. नवाब भाईच्या पाठीमागे पवार साहेब व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. झुकेगा नाही साला. ईड्या, बिड्या, काड्या लावून काहीही करतील आम्ही बिलकुल झुकणार नाही असे म्हणत त्यांनी केंदीय यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर देखील जोरदार घणाघात केला.
कार्यक्रमादरम्यान बोलताना सक्षणा सलगर यांना अश्रू अनावर झाले. स्वतः शरद पवार कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याने इतक्या सामान्य कार्यकर्त्यांच्या कार्यक्रमाला स्वतः शरद पवार उपस्थित राहिले. वडिलांना सुद्धा वाटले होते इतका मोठा माणूस आपल्या कार्यक्रमाला येणार नाही पण शरद पवार कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि कार्यक्रमात भाषण सुरू असताना सक्षणा सलगर भावुक झाल्या.