Shakti Mill Gangrape : शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणी दोषींना फाशीऐवजी जन्मठेप
महीला सुरक्षेचा मुद्द्यावरुन संपूर्ण देश हादरुन टाकणाऱ्या मुंबईतील शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणी आज मुंबई हायकोर्टाने तिन्ही आरोपींच्या फाशीची शिक्षा जन्मठेपेत रुपांतरीत केली आहे. २०१३ मधील या प्रकरणातील आरोपींनी फाशीच्या शिक्षेला आव्हान दिल्यानंतर घटना घडली तेव्हा लोकांचा रोष अधिक होता. पण कायद्याचा विचार करता हे प्रकरण फाशीचे नाही असं कोर्टाने यावेळी स्पष्ट केलं आहे.
या प्रकरणामुळं मुंबई हादरली होती. त्यानंतर हा खटला फास्टट्रॅकवर चालवण्यात आला. मुंबई सत्र न्यायालयाने ४ डिसेंबर २०१४ रोजी विजय जाधव, कासीम बंगाली, सलिम अंसारी यांना फाशी सुनावली. या सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला आरोपींनी आव्हान दिलं होतं. आरोपींची शिक्षा निश्चित करण्यासंबंधीचा निर्णय हायकोर्टाने राखून ठेवला होता. दरम्यान आज निर्णय सुनावताना कोर्टाने फाशीची शिक्षा रद्द केली असून शिक्षेचे जन्मठेपेत रूपांतर करण्याचा निर्णय दिला.
"या घटनेने समाजाला खूप मोठा धक्का दिला. बलात्काराची प्रत्येक घटना ही खूप मोठा गुन्हा आहे. यामुळे फक्त शारिरीक नाही तर मानसिक आरोग्याला हानी पोहोचते. पीडितेच्या सन्मानावर हा हल्ला असतो. पण घटनेवर चालणारं कोर्ट लोकांच्या मतांच्या आधारे शिक्षा ठरवू शकत नाही. नियमाप्रमाणे जन्मठेपेची शिक्षा असून, फाशी हा एक अपवाद आहे. त्यामुळे योग्य विचार करुन निर्णय घेतला पाहिजे. अशा घटनांमध्ये प्रक्रिया विसरुन चालणार नाही," असं कोर्टाने आवर्जून स्पष्ट केलं आहे. "फाशीची शिक्षा रद्द करताना आम्ही प्रक्रियेचं पालन केलं आहे," असं सांगत कोर्टानं "आरोपी जन्मठेपेच्या शिक्षेस पात्र आहेत. महिलांकडे एक वस्तू म्हणून पाहणारे हे आरोपी नैसर्गिक मृत्यू होईपर्यंत जन्मठेपेच्या शिक्षेस पात्र आहेत" असं सांगितलं.
"आरोपींनी दिलेली कबुली आणि पीडित तरुणी वासनेचा विषय होता अशी टिप्पणी यावरून त्यांच्यात सुधारणा होण्यासाठी वाव नाही असं दिसतं. आरोपींच्या कुटुंबीयांना घर सोडावं लागलं होतं याची दखल घेऊ शकत नाही," असंही कोर्टाने सांगितलं. कोर्टाने यावेळी आरोपी पॅरोल किंवा फर्लोसाठी अर्ज करु शकत नाहीत असंही कोर्टानं स्पष्ट केलं आहे.``
मुंबईतील महालक्ष्मी येथील शक्ती मिल कंपाऊंडमध्ये २२ ऑगस्ट २०१३ ला एका महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. छायाचित्रकार असणारी महिला आपल्या सहकाऱ्यासोबत फोटाग्राफी करण्यासाठी गेली होती. यावेळी पाच जणांनी तिच्यावर बलात्कार केला होता. हे प्रकरण समोर आल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापची लाट उसळली होती. पोलिसांनी याप्रकरणी विजय जाधव, कासीम बंगाली, सलिम अन्सारी, सिराज खान आणि एका अल्पवयीन मुलाला अटक केली होती. कोर्टाने सिराज खान याला जन्मठेपेची आणि इतर तिघांना फाशीची शिक्षा सुनावली होती. तर अल्पवयीन मुलाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.