शनिवारची सकाळ संपूर्ण देशाला हादरवून सोडणारी बातमी घेऊन आली आहे. महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात नवजात शिशू केअर युनीटला आग लागल्यामुळे १० नवजात बालकं दगावली आहेत. शनिवारी पहाटे २ च्या सुमारास ही आग लागली असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. या घटनेनं संपूर्ण देशात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
भंडारा जिल्हा सामान्य रूग्णालयात लागलेली ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती येत आहे. शनिवारी पहाटेच्या दरम्यान अचानक रुग्णालयातील आऊट बॉर्न युनिट मधून धूर निघत असल्याचं समोर आले. ड्युटीवर असलेल्या नर्सने दार उघडून बघितला असता त्या रूम मध्ये मोठ्या प्रमाणात धूर होता. त्यामुळे या नर्सने लगेच दवाखान्यातील अधिकाऱ्यांना सांगितले.
या शिशू केअर युनीटमध्ये एकूण १७ बालकांना ठेवण्यात आलं होतं. आग लगाल्याचं कळायला उशीर झाल्यामुळे १७ बालकांपैकी सात बालकांना वाचविण्यात रूग्णायल प्रशासन यश आलं आहे. मात्र इतर दहा बालकांच्या या आगीत गुदमरून मृत्यू झाला आहे. या घटनेबद्दल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना अशा घटना पुन्हा घडणार नाहीत याची काळजी घेतली जाईल. तसेच या घटनेतील मृत बालकांच्या कुटुंबियांना सरकारकडून मदत केली जाईल. लवकरच रुग्णालयात जाऊन मी स्वत: पाहणी करेन असं सांगितलं. तसेच या घटनेतील दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल असं ते म्हणाले.
भंडाऱ्यातील या घटनेनंतर देशभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राहुल गांधी यांच्यासह अनेक बड्या नेत्यांनी या संदर्भात ट्विट करून आपला शोक व्यक्त केला आहे.तसेच या घटनेबद्दल राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी त्यांत्या फेसबुकवरून "भंडारा येथील घटना ह्रदय पिळवटून टाकणारी आहे. आगीत दगावलेल्या १० नवजात बालकांच्या परिवाराच्या दु:खाची कल्पनाही करता येत नाही. बातमी ऐकल्यापासून मन सुन्न झालंय. या आगीत जखमी झालेल्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करूयात." अशी प्रतिक्रीया दिली आहे.
तसेच भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी "भंडा-यातील अग्नितांडवात नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेने मन सुन्न झाले. या घटनेने चिमुकल्यांच्या माता पित्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, त्यांच्या कुटंबियांप्रति मी शोक व्यक्त करते. सरकारने या घटनेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी !" अशी पोस्ट लिहून दोषींवर तात्काळा कारवाईची मागणी केली आहे.