अजून जलयुक्त शिवार घोटाळ्याची चौकशी बाकी; चंद्रकांत पाटलांना चाकणकरांचा टोला
याला महागात पडेल, त्याला बघून घेऊ, याच्यावर गुन्हा दाखल करा, त्याला आत टाका याच्यावर पीएचडी करता-करता ते आता एमफिल सुद्धा करायला लागले आहात.;
मुंबई: जामिनावर सुटलेला आहात, जोरात बोलू नका अन्यथा महागात पडेल,असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी मंत्री छगन भुजबळांना दिला होता. यावरूनच राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला. भाजप काळातील जलयुक्त शिवारसह अनेक घोटाळ्यांची चौकशी बाकी असल्याचा टोलाही त्यांनी पाटलांना लगावला.
छगन भुजबळांनी बंगालच्या निकालावरुन भाजपवर टीका केली होती. यावर बोलताना पाटील म्हणाले होत की, भुजबळांनी पंढरपूरवर प्रतिक्रिया द्यावी, जामिनावर सुटलेला आहात, त्यामुळं तुम्ही फार जोरात बोलू नका अन्यथा महागात पडेल.
त्यालाच उत्तर देताना चाकणकर म्हणाल्या की, देशासह राज्यात कोरोनामुळे अतिशय वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे, मात्र चंद्रकांत पाटील यांना याच काहीही घेणंदेणं नसून,याला महागात पडेल, त्याला बगून घेऊ, याच्यावर गुन्हा दाखल करा, त्याला आत टाका याच्यावर पीएचडी करता-करता ते आता एमफिल सुद्धा करायला लागले आहात. तसेच जामिनावर बाहेर असल्याचं भुजबळांना म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटील यांनी मागे वळून पाहिलं तर, त्यांचे अनेक नेते जामिनावर बाहेर आहेत. आणि जर जामिनावरच बोलायचं झालं तर, जलयुक्त शिवार घोटाळा, चिक्की घोटाळा,मुंबई बँक घोटाळा असे अनेक घोटाळ्यांची चौकशी अजून बाकी आहे, असा टोलाही चाकणकर यांनी पाटील यांना यावेळी लगावला.
तसेच पाटील यांना आपल्या गावातील ग्रामपंचायत सुद्धा निवडून आणता आली नाही. कोल्हापूरला महापौर तुम्हाला तुमच्या विचारांचा बसवता आला नाही. एवढच नाही तर आपला मतदारसंघ सोडून पुण्यातील एक महिलेचा सुरक्षित असा मतदारसंघ पाटील यांना निवडावा लागला,असल्याचा टोलाही चाकणकर यांनी लगावला.