"नाती टिकवायची असतील तर एकमेकांचा बिनशर्त स्वीकार हवा"
आनंदी सहजीवन कार्यशाळेतील तज्ज्ञांचे मार्गदर्शन
पुणे:
'नाती जपताना आणि टिकवताना एकमेकांच्या विचारांचा आदर करणे जरुरीचे आहे.प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र विचारांची असते,लग्नामध्ये दोन स्वतंत्र व्यक्तिमत्वाची लोक एकत्र येतात त्यामुळे त्याचे विचार,स्वभाव,आवडी निवडी भिन्न असणारच आहेत याचा स्वीकार करून नातं कसं टिकवावं', असा सूर "नातं तुझं, नी माझं ,आनंदी सहजीवनाचं" या कार्यशाळेत उमटला. या कार्यशाळेत तज्ञांनी विचार मांडले.
सकाळ तनिष्का आणि भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेज कौटुंबिक व कायदा सल्ला केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २५ ऑगस्ट रोजी भारती विद्यापीठ सभागृह, कोथरूड येथे या कार्यशाळेचे आयोजन केले होते.
कार्यशाळेच्या उद्घाटन सत्रामध्ये भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेजच्या प्राचार्य व विधी शाखेच्या अधिष्ठाता डॉ.उज्वला बेंडाळे यांनी न्यू कॉलेज न्यू लॉ कॉलेज च्या कौटुंबिक सल्ला व मार्गदर्शन केंद्र बाबतची माहिती सांगितली त्यानंतर सकाळ तनिष्का व्यासपीठाच्या राज्य प्रमुख, सहयोगी संपादक वर्षा कुलकर्णी यांनी तनिष्का व्यासपीठाच्या उपक्रमाची माहिती करून दिली.सकाळ तनिष्का मार्फत चालणाऱ्या समुपदेशन उपक्रमात सहभागी होणाऱ्या समुपदेशक श्रद्धा सरदेशमुख, अश्विनी कळंबकर, रश्मी वेंगुर्लेकर आणि सुप्रिया देवकर यांचा सन्मान करण्यात आला. यानंतर कार्यशाळेत डॉ.स्मिता प्रकाश जोशी (ज्येष्ठ विवाह समुपदेशक) डॉ. सागर पाठक (स्त्रीरोग तज्ञ व लैंगिक उपचार तज्ञ) पूर्वा दिक्षित (मानसोपचार तज्ञ) आणि अभय आपटे (ज्येष्ठ विधीज्ञ) यांनी मार्गदर्शन केले.रोल प्ले करण्यासाठी समन्वयक म्हणून प्रतिभा राणे आणि भारत विद्यापीठ लॉ कॉलेजचे प्रा. सलील शृंगारपुरे यांनी मदत केली आणि 'फोर सी'ज कौन्सिलिंग सेंटर चे सभासद व भारती विद्यापीठ विधी महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला.
लग्न हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. आपल्याला आयुष्यभर साथ देणारा, आपल्याला समजावून घेणारा जोडीदार मिळावा असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण परंतु जोडीदाराबाबत रंगवलेली सर्व स्वप्न पुरी होतातच असं नाही.लग्ना मध्ये दोन वेगळ्या वातावरणात राहिलेली,स्वतंत्र आणि विभिन्न व्यक्तिमत्वाची लोक एकत्र येत असतात, त्यामुळे लग्नानंतर सुरुवातीचे फुलपाखरी दिवस संपल्यानंतर एकमेकांच्या स्वभावाचे कंगोरे टोचू लागतात.एकमेकांसोबत राहताना घुसमट होऊ लागते. नात्यात तिच्या आणि त्याच्या नातेवाईकांचा हस्तक्षेप वाढला की नात्यात अधिकच अडचणी निर्माण होतात ज्या नात्यात आनंद शोधण्याचा प्रयत्न केला त्याच नात्याचा मनःस्ताप होतो. या सर्व गोष्टी रोल प्ले च्या माध्यमातून उलगडून दाखवत त्या विषयावर चर्चा चांगलीच रंगली होती.
लग्नापूर्वी आई आणि मुलगी या नात्यातील वाद संवाद,लग्न झाल्यानंतर सुरुवातीच्या काळातील वाद, नात्यातील इतरांचा हस्तक्षेप, मिडलाईफ क्रयसेस, विवाहबाह्य संबंध,आणि उतारवयातील सहजीवन आणि या प्रत्येक टप्प्यावरची मानसिकता, लैंगिक गरजा आणि त्याचे नातेसंबंधावर होणारे परिणाम आणि त्याच बरोबर नात्यांमधील कायदा
व त्यातील तरतुदी इत्यादी सर्व गोष्टींचा ऊहापोह या कार्यशाळेत करण्यात आला.
लग्नातील नात्यात वेगळेपणातही आनदं कसा शोधायचा? नाती सुदृढ होण्यासाठी काय करायचं?कायद्याचा आधार केव्हा आणि किती घ्यायचा? याबाबत तज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केलं
उद्घाटन सत्राचे सूत्र संचालन अश्विनी कळंबकर यांनी केले आणि कार्यशाळेमध्ये डॉक्टर स्मिता प्रकाश जोशी यांनी सर्वांशी चर्चा करून संवाद घडवून आणला. नातं तुझं नी माझं कसं जपायचं आणि कसं वृद्धिंगत करायचं या बद्दलच्या महत्वाच्या टिप्स या कार्यशाळेत देण्यात आल्या. सकाळ तनिष्का व्यासपीठाचे महिलांनी या कार्यशाळेत सहभाग नोंदवला होता.