पुण्यात २० ते २२ डिसेंबरला बालरंगभूमी परिषदेचे 'बालरंगभूमी संमेलन'

Update: 2024-12-08 06:09 GMT

बालरंगभूमी परिषदेच्या वतीने २० ते २२ डिसेंबर या कालावधीत पुण्यातील अण्णा भाऊ साठे नाट्यगृह येथे पहिले बालरंगभूमी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. नाट्य-चित्रपट अभिनेते मोहन जोशी यांची या बालरंगभूमी संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते बालरंगभूमी संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. 7 डिसेंबर 2024 रोजी पुण्यात बालरंगभूमी परिषदेच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा अभिनेत्री ॲड. नीलम शिर्के-सामंत यांनी पत्रकार परिषदेला मार्गदर्शन केले. पत्रकार परिषदेस बालरंगभूमी परिषदेचे कार्याध्यक्ष राजू तुलालवार, उपाध्यक्ष शैलेश गोजमगुंडे, दीपा क्षीरसागर, प्रमुख कार्यवाह सतीश लोटके, कोषाध्यक्ष नंदकुमार जुवेकर, पुणे शाखेच्या अध्यक्ष दिपाली शेळके, कार्यकारी सदस्य दिलीप रेगे, योगेश शुक्ल, नागसेन पेंढारकर, अनंत जोशी, पुणे शाखेचे पदाधिकारी देवेंद्र भिडे उपस्थित होते.


पत्रकार परिषदेदरम्यान ॲड. नीलम शिर्के-सामंत म्हणाल्या की, "शिक्षण हा बालकाचा अधिकार आहे आणि कलाशिक्षण बालकांच्या व्यक्तिमत्व विकासाची गरज आहे. बालकांच्या मनोरंजनासाठी व प्रबोधनासाठी बालरंगभूमी परिषद सातत्याने कार्यरत आहे. नृत्य, नाट्य, गायन, वादन या रंगमंचीय कलांसोबत लहान मुलांना रमवणारे बाहुल्यांचे खेळ, जादूचे खेळ, शॅडो प्ले, जगलरी, इत्यादी खेळ बालरंगभूमीच्या कक्षेत येतात. मुलांसाठी कार्यरत असणाऱ्या रंगमंचीय कलेचा, खेळांचा प्रचार आणि प्रसार करण्याचे उद्दिष्ट घेऊन वाटचाल करीत असलेल्या बालरंगभूमी परिषदेचे कार्य महाराष्ट्रभर २८ शाखांच्या माध्यमातून होत आहे. या शाखांचे कार्य व बालकलावंतांना राज्यस्तरावर व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने पहिल्या बालरंगभूमी संमेलनाचे आयोजन केले आहे. यावेळी बोलतांना त्यांनी बालरंगभूमी संमेलनाचे उद्दिष्ट या संमेलनात सादर होणारे राज्यभरातील बालकलावंत व दिव्यांग बालकलावंतांच्या कार्यक्रमाची माहिती दिली. बालरंगभूमी संमेलनाध्यक्षपदी सिने-नाट्य अभिनेते मोहन जोशी यांचे नाव निश्चित झाले असून, संमेलनाचे उद्घाटन जेष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे नाट्य परिषदेचे अध्यक्ष अभिनेते प्रशांत दामले, अभिनेते सयाजी शिंदे, अजित भुरे, अभिनेते व सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष विजय गोखले, सविता मालपेकर, सुबोध भावे यांच्यासह नाट्य व बालनाट्य क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

Tags:    

Similar News