लोखंडी सळईने तरूणीला बेदम मारहाण, आरोपी तरूणीचा क्रिडा प्रशिक्षक

Update: 2022-04-25 10:26 GMT

लोखंडी सळईने तकरूणीला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवली मध्ये घडलाय. या तरूणीला इतकं मारलं गेलंय की तिच्या गुडघ्याचं हाड मोडलंय. या प्रकरणी तरूणीने मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपीवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पुण्याच्या नामवंत कंपनीत डेटा इंजिनिअर म्हणून काम करत असलेल्या २७ वर्षीय तरूणीला एका क्रीडा प्रशिक्षकाने बेदम मारहाण करून तिला जबर जखमी केले आहे. लग्नाचं आमीष दाखवून या क्रीडा प्रशिक्षकाने तरूणीला नऊ वर्षांपासून आपल्या जाळ्यात ओढले होते. त्यानंतर तो तिच्यावर सातत्याने अत्याचार करत होता. तिच्या चारीत्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करत होता. याशिवाय तिची अर्धनग्न छायाचित्र समाजमाध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी देखील देत होता. हे प्रकार वाढत गेल्या काही दिवसांत वाढत चालल्याने अखेर इंजीनिअर असलेल्या तरूणीने मानपाडा पोलीस ठाण्यात रविवारी रात्री या क्रीडा प्रशिक्षकाविरूध्द तक्रार नोंदवली.

या क्रीडा प्रशिक्षकाविरुद्ध मानपाडा पोलिसांनी बलात्कार, मारहाण, धमकावणे या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. रामेश्वर बाळू पाठक (३१, रा. रेडी कम्पाऊंड, मानपाडा रोड, डोंबिवली पूर्व) असे क्रीडा प्रशिक्षकाचे नाव आहे. तरूणी डेटा इंजीनिअर असून ती घरातून पुण्याच्या कंपनामध्ये काम करते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सगळा घटनाक्रम असा आहे. डोंबिवली एमआयडीसीमध्ये राहणारी एक तरूणी याच भागातील एका नामवंत शाळेत शिक्षण घेत होती. ती सॉफ्ट बॉल, बेस बॉल खेळात निपुण आहे. शाळेत असताना तिची निवड जळगाव येथील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली होती. या स्पर्धेच्यावेळी क्रीडा प्रशिक्षक म्हणून रामेश्वर बाळू पाठक यांनी नेतृत्व केले होते. या स्पर्धेच्या माध्यमातून तरूणी आणि रामेश्वर यांची ओळख झाली. ओळखीची रूपांतर प्रेमात झालं. एक दिवस रामेश्वर यांनी तरूणीला घरी नेलं. मी तुझ्याबरोबर लग्न करणार आहे, असे सांगून तिच्यावर बलात्कार केला. रामेश्वर, तरूणी विविध ठिकाणी फिरायला जात होते. मोबाईलवर सतत बोलणे होतच होते.

सन २०१९ मध्ये रामेश्वर याच्या स्वभावात बदल होऊन तो तरूणीला तु कोणा मुलाशी बोलायचे नाही असे सांगू लागला. तेव्हापासून तो तरूणीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करू लागला. तू कोणा बरोबर बोललीस तर तुझी बदनामी करीन, अशी धमकी देत होता. लग्न होणार असल्याने तरूणी ते निमुटपणे सहन करत होती. गेल्या महिन्यात तरूणीची बहिण आईच्या घरी आली होती. हे रामेश्वरला समजले. त्याने तरूणीला संपर्क करून तुझी बहिण घरी आली आहे हे मला का सांगितले नाहीस, अशी मोबाईलवर दरडावून विचारून तिला त्याच्या घराजवळील रेडी कम्पाऊंड जवळ भेटायला बोलविले. तरूणी दुचाकीवरून त्याला भेटायला गेली. रामेश्वरने बहिण आली आहे हे का मला सांगितले नाही, असे विचारून तिला मारहाण सुरू केली.

लोखंडी सळईने तिच्या दोन्ही पायांवर प्रहार केले. तरुणीच्या कानातून रक्त येत होते. तशा परिस्थितीत तरूणी लगंडत घरी आली. घरात तिने दुचाकी स्टॅन्ड आपल्या पायाला लागला आहे असे खोटे सांगितले. वडिलांनी तरूणीला खासगी दवाखान्यात नेले. त्रास असह्य झाल्याने एका हाडांच्या डॉक्टरकडे नेण्यात आले. तेथील डॉक्टरनी एक्स रे काढल्यानंतर तरूणीच्या पायाच्या घोट्याच्या वरती हाड मोडले असल्याचे सांगितले.

गेल्या १५ दिवसापूर्वी तरूणीचे भुसावळ येथील मामा वारले. तरूणीसह कुटुंब भुसावळला गेले होते. त्यावेळी रामेश्वर तरूणीला संपर्क करून 'तुझी अर्धनग्न छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसारित करतो' अशी धमकी देऊ लागला. मामाचे विधी कार्य उरकून तरूणी कुटुंबासह रविवारी (ता.२४) भुसावळहून डोंबिवलीत परतली. तिने प्रियकर रामेश्वरकडून सुरू असलेला त्रास कार्यालयीन सहकाऱ्याला सांगितला. कर्मचाऱ्याने मुलीच्या आई, वडिलांना घडला प्रकार सांगितला. हा प्रकार ऐकून पालक हैराण झाले. त्यांनी रविवारी रात्री मानपाडा पोलीस ठाण्यात जाऊन रामेश्वर पाठक याच्या विरूध्द तक्रार केली. त्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मानपाडा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Tags:    

Similar News