कोवीडमुळे पालक गमावलेल्या पाल्यांच्या प्रस्तावांवर तातडीने कार्यवाहीचे औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
औरंगाबाद: कोविड संसर्गाने आई-वडील यापैंकी एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या पाल्यांना शासन निर्देशानुसार आवश्यक सहाय्य उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात महिला व बाल विकास अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जिल्हा कृती दलाची बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील एक किंवा देान्ही पालक गमावलेल्या 402 पाल्यांच्या प्रस्तावांवर आवश्यक कार्यवाही शीघ्रतेने करुन जूलैच्या पहिल्या आठवड्यात बाल कल्याण समितीने बैठक घेऊन या पाल्यांना बालसंगोपन किंवा बालगृह मध्ये ठेवण्याच्या अनुषंगाने प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देशित केले.
त्याचप्रमाणे दोन्ही पालक गमावलेल्या जिल्ह्यातील 15 पाल्यांच्या नावाने शासन निर्णयानुसार पाच लक्ष रुपयांची रक्कम बँकेत ठेवण्याबाबतची कार्यवाही जिल्हास्तरावर पूर्ण करावी.तसेच जिल्ह्यातील या 405 मुलांची तालुकानिहाय यादी करुन संबंधित आमदारांना पाठवावी. पात्र पाल्यांना अनाथ प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरू करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली.कोवीडमुळे पालक गमावलेल्या पाल्यांच्या प्रस्तावांवर तातडीने कार्यवाहीचे औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
एक पालक गमावलेल्या 387 आणि दोन्ही पालक गमावलेल्या 15 अशा एकूण 402 पाल्यांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू आहे. कोवीडमुळे विधवा झालेल्या महिलांची संख्या 220असून त्यापैंकी 94 महिलांची माहिती संकलित करण्यात आली असून संबंधित विभागाकडे प्रस्ताव सादर करण्याची कार्यवाही सुरू असून तसेच जिल्ह्यातील एकूण कार्यरत 21 बालगृहातील कर्मचाऱ्यांची लसीकरण प्रक्रिया सुरु असल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नागेश पुंगळे यांनी दिली.