नुपूर शर्मा प्रकरणामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतावर टीका होत असताना आता अल कायदा या दहशतवादी संघटनेने भारतामध्ये आत्मघाती हल्ले करणार असल्याची धमकी दिली आहे. गुजरात, उत्तर प्रदेश, मुंबई आणि दिल्लीमध्ये हे आत्मघाती हल्ले करणार असल्याची अधिकृत धमकी अल-कायदा दहशतवादी संघटनेने दिली आहे. टीव्हीवरील डिबेट शो दरम्यान भाजप नेत्या नूपुर शर्मा यांनी पैगंबर यांच्या बाबत अपशब्दांचा वापर केला होता. या वक्तव्यामुळे च अल कायदाने ही धमकी दिली आहे. त्यांनी त्यांच्या मेसेज मध्ये या डिबेट शोचा उल्लेखही केला आहे. अल कायदाने या धमकीत, पैगंबरांच्या अपमानाचा बदला आम्ही घेऊ. आम्ही आणखी लोकांनाही या लढाईत सामील होण्यास सांगू. आम्ही त्या लोकांना मारून टाकू जे पैगंबर मोहम्मद यांचा अपमान करतील. आम्ही आमच्या तसेच आमच्या मुलांच्या शरीरामध्ये विस्फोटक बांधू जेणेकरून अशा लोकांना उडवलं जाऊ शकेल. पैगंबर मोहम्मद यांच्या अपराध्यांना आम्ही माफ नाही करणार. दिल्ली-मुंबई, उत्तर प्रदेश आणि गुजरात मधील भगव्या कार्यकर्त्यांना संपवणार. ते त्यांच्या घरात लपूही शकणार नाहीत आणि सुरक्षा दलही त्यांना वाचवू शकणार नाहीत. असं या धमकीत म्हटलं आहे.
नुपूर शर्मा यांना दिल्ली पोलिसांची सुरक्षा
पैगंबर मोहम्मद यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्याचा मुद्दा जोर धरत आहे. या प्रकरणात नुपूर शर्माला धमक्या आल्याचा आरोप तिने केला आहे. त्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी नुपूर शर्माला सुरक्षा पुरवली आहे.