गर्भपाताच्या औषधांची विक्री प्रकरणी ॲमेझॉन-फ्लिपकार्टला नोटीस; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

Update: 2021-07-30 03:01 GMT

गर्भपाताकरिता वापरात येणाऱ्या औषधाची Medical Termination of Pregnancy Kit (MTP) KIT) ऑनलाईन विक्री होत असल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाने ऍमेझॉन (amazon) आणि फ्लिपकार्ट (flipkart) या दोन्ही कंपन्यांना नोटीस पाठवली आहे. या दोन्ही ऑनलाईन संकेतस्थळावर गर्भपातासाठी लागणाऱ्या औषधांची सर्रास विक्री होत असल्याचं समोर आले असून, त्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

प्रशासनाच्या वतीने एकूण 34 ऑनलाईन संकेतस्थळावर गर्भपातासाठी लागणाऱ्या औषधांच्या उपलब्धतेबाबत पडताळणी करण्यात आली. त्यानुसार ॲमेझॉन (amazon) या संकेतस्थळावर प्रशासनातील अधिकाऱ्यांनी ग्राहक म्हणून मागणी नोंदविली. त्यानुसार डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय गर्भपाताच्या औषधाची मागणी दोन वेळा ॲमेझॉन (amazon) वर स्वीकारून त्याची गुरुनानक इंटरप्राइजेस, लखनऊ, उत्तर प्रदेश व चौधरी फार्मास्युटिकल्स /पिरामल लि., कोरापूर, ओरिसा या संस्थेकडून औषधे पुरविण्यात आले. त्यामुळे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय MTP kit औषधाची ऑनलाईन विक्री करणे हे औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 मधील तरतुदींचे उल्लंघन आहे. प्रशासनाने ॲमेझॉन (amazon) व संबंधित वितरक यांना यासंदर्भात नोटीस बजावली असून पुढील कारवाई करण्यात येत आहे.

दुसऱ्या एका प्रकरणात फ्लिपकार्ट (flipkart) या ऑनलाईन संकेतस्थळावर गर्भपातासाठी लागणाऱ्या औषधाची मागणी नोंदविली असता डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची मागणी न करता फ्लिपकार्ट च्या (flipkart) संकेतस्थळावर दोनवेळा औषधाची मागणी स्वीकारण्यात आली व ते पुरविण्यात येणार असल्याचे देखील संकेतस्थळावरुन एसएमएस संदेशद्वारे कळविण्यात आले. वास्तविक गर्भपातासाठी वापरात येणाऱ्या औषधांची डॉक्टर प्रिस्क्रिप्शनशिवाय विक्रीस होकार दर्शविणे, हे देखिल कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करणारे असल्याने फ्लिपकार्ट या (flipkart) कंपनीस नोटीस बजाविण्यात आली असून पुढील कारवाई करण्यात येत आहे.



नुकतेच पुणे येथे ॲमेझॉन (amazon) या संकेतस्थळावरुन MTP Kit ची विक्री पुण्यातील औषध विक्रेत्यास केल्याने औषध विक्रेत्याने पुणे येथील अन्न व औषध प्रशासन कार्यालयास तकार दाखल केली होती. या तक्रारी अनुषंगाने प्रशासनाने तातडीने कारवाई करुन यामध्ये सामील असलेला पुरवठादार, मे. आर. के. मेडिकल, अहमदाबाद, गुजरात यांचेकडे प्रत्यक्ष जावून चौकशी केली. या वितरकाकडे औषधाचे खरेदी बिल नसल्याचे उडकीस आले आहे. त्यामुळे प्रशासनाकडून संबंधिताविरुध्द पुणे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील कारवाई करण्यात येत आहे.

Tags:    

Similar News