धक्कादायक : आंतरजातीय विवाह केला म्हणून ग्रामस्थांकडून मारहाण करत छळ...
पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा जातिभेदाचा वास्तव समोर आले आहे.
जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील बाभळेनाग येथे आंतरजातीय विवाह केला म्हणून नवदाम्पत्य तसेच मुलाच्या कुटुंबियांना मुलींच्या कुटुंबियांसह ग्रामस्थांकडून मारहाण करत छळ केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
विशेष म्हणजे तरुण गावातच ग्रामपंचायत सदस्य असतांनाही गावातील सरपंच तसेच मुलीकडचे लोक आपल्या कुटुंबियांना त्रास देत असल्याचा आरोप नवदाम्पत्याने केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आपला छळ सुरू आहे, स्थानिक पारोळा पोलीस स्टेशन , जिल्हा पोलिस मुख्यालय , नासिक परिक्षेत्र विभागातही तक्रार निवेदन करून दखल घेतली नाही, असा आरोप या पीडित दाम्पत्याने केला आहे. आता या नवदाम्पत्याने पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांची भेट घेऊन संरक्षण देण्याची मागणी केली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण
१५ ऑगस्टला गावातील एक तरुण -तरुणीने आंतरजातीय विवाह केल्यानंतर पारोळा पोलिसात हजर झाले. पोलिसांनी मुलगा व मुलगी दोघांच्या आई वडीलांना बोलावले. मुलगी सज्ञान असल्याने तिने पतीसोबत राहण्याचे सांगितल्यावर कायदेशीररित्या नोंदही करण्यात आली. मात्र आता मुलगी परत द्या म्हणत मुलीचे वडील तसेच नातेवाईक मुलाला तसेच त्यांच्या कुटुंबियांना बेदम मारहाण करत छळ करत आहेत, असा आरोप त्या तरुणाने केला आहे. याबाबत पारोळा पोलिसात तक्रार दिल्यावर पोलिसांकडून कुठलीही कारवाई होत नाही असे त्यांचे म्हणणे आहे.
"आंतरजातीय विवाह केला म्हणून माझ्या आईवडीलांना घरात घुसून तसेच सार्वजनिक ठिकाणी मारहाण केली जात आहे, शिवीगाळ केली जात आहे. पत्नीला तसेच मलाही मारहाण करण्यात येत असून छळ केला जात आहे. गावात राहायचे नाही म्हणत गाव सोडले नाहीतर जीवे मारणयाची धमकीही मुलीच्या कुटुंबियांकडून दिली जात आहे" असे पीडित दाम्पत्याचे म्हणणे आहे. गावातील सरपंचही चुकीच्या गोष्टीला पाठिंबा देत असल्याचा आरोप नवदाम्पत्याने केला आहे. दोघांनी एकमेकांच्या संमतीने कायदेशीररित्या हा विवाह केला असून न्याय मिळावा मिळावी अशी मागणी दाम्पत्याने केली आहे.
याप्रकरणात पोलिसात परस्परविरोधात तक्रारी दाखल आहेत. त्यांची योग्य ती चौकशी करण्यात येवून कारवाई करण्यात येईल. मुलीच्या वडीलांना समज देण्यात येवून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. मुलगा व मुलगी सज्ञान असल्याने कायदेशीररित्या त्यांना काहीही होवू नये म्हणून पोलीस त्यांच्या पाठीशी आहेत.