कर्जत आणि जामखेडने स्वच्छ सर्वेक्षणात सहभाग घेतला आहे. त्यासाठी स्थानिक नागरिक, पदाधिकारी, प्रशासन यांच्या सोबतीला स्थानिक आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार देखील या मोहिमेत सहभागी झाल्या आहेत. दोन्ही शहरांतील नागरिकांच्या वॉर्ड निहाय बैठका घेत, त्यांच्याशी संवाद साधून स्वच्छतेसंदर्भातील जनजागृती त्यांनी केली. त्यासोबतच स्वतः हातात खोरे-टिकाव घेवून अधिकाऱ्यांसोबत श्रमदानही केलं.
आपल्या मुलाच्या मतदारसंघाचा प्रथम क्रमांक यावा, यासाठी स्वतः सुनंदा पवार मैदानात उतरल्या आहेत. मुलगा कुठल्याही क्षेत्रात असला तरी त्याला आईची साथ असतेच. असंच उदाहरण पवार कुटुंबियातून समोर आलं आहे. निवडणुका नसताना सुनंदा पवार कामासाठी पुढाकार घेत आहेत. 'कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात स्वतःपासुन व्हावी' हा मूलमंत्र देणाऱ्या सुनंदा पवार यांनी स्थानिक पातळीवर उतरून स्वच्छतेची सुरुवात केल्याने त्यांचं कौतूक होत आहे.