रुपाली चाकणकर यांनी दिला अध्यक्षपदाचा राजीनामा
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी महिला अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.;
राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सध्या त्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत.
चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर आता राष्ट्रवादी काॅंग्रेस कोणाला नवी महिला अध्यक्ष बनवणार याची उत्सुकता आहे. रुपाली चाकणकर या सुरुवातीला पुणे शहर राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा म्हणून काम पाहत होत्या. कालांतराने त्यांना राष्ट्रवादीच्या प्रदेश महिला उपाध्यक्षा म्हणून संधी मिळाली. राज्यात 2019 च्या विधासभा निवडणुकीच्या आधी महिला राष्ट्रवादीच्या तत्कालीन प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी अचानक भाजप प्रवेश केल्याने त्या जागी रुपाली चाकणकर यांना संधी मिळाली.
सुरवातीला वाघ यांच्या सहकारी म्हणून काम पाहणाऱ्या रुपाली चाकणकर या नंतर त्यांच्यावर जोरदार टीका करू लागल्या. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर चाकणकर यांना अनेक महिने रिक्त असलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची संधी मिळाली. हे पद अर्धन्यायिक स्वरूपाचे असल्याने या पदावरील व्यक्तींनी पक्ष संघटनेत राहावे का, यावर नेहमीच मतं मतांतरे दिसून येतात. त्यांनी आता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद सोडले आहे. आता त्यांच्या जागी कोणाला महिला राष्ट्रवादीचे नेतृत्व करण्याची संधी मिळणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
मनसेतून नव्याने राष्ट्रवादीत आलेल्या रुपाली पाटील ठोंबरे यांची या पदावर वर्णी लागू शकते असं बोललं जातंय. याशिवाय पक्षाचा युवा आणि चर्चेत राहणार चेहरा म्हणजे सक्षणा सलगर यांना देखील ही संधी मिळू शकते असं बोललं जातंय. हेमा पिंपळे यांचंही नाव चर्चेत आहेच. याशिवाय आणखीनही अनपेक्षित चेहरा आपल्याला राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी दिसू शकतो.