केंद्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा या सोमवारी महाष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या लिखीत दौऱ्यानुसार त्या राज्यातील महिलांच्या तक्रारी जाणून घेणार आहेत. आणि त्यानंतर महिलांच्या तक्रारीनुसार समंधीत चौकशी समितीची बैठव बोलवण्यात आली आहे.
या पहिला दोन ओळी वाचून तुम्ही म्हणाल "वा छान काय चांगलं काम करत आहेत..." पण जरा थांबा लगेच व्यक्त होऊ नका. आधी माननिय अध्यक्षांचा दौरा समजून घ्या. कारण हा दौरा समजून घेतल्यावर तुम्हाला ही प्रश्न पडेल 'हा दौरा महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे की, राजकीय कारणासाठी दौरा आहे. केंद्रीय महिला आयोगाने या दौऱ्याची माहिती देणारे पत्र राज्याच्या मुख्य सचिवांना दिलं आहे.
आता हा दौरा बघूया....
माननीय अध्यक्षा रविवारी संध्याकाळी एअर इंडीयाच्या विमानाने दिल्लीहून मुंबईला येणार आहेत. त्यानंतर सोमवारी सकाळी चौकशी समिती सोबत बैठक आहे. या बैठकीनंतर त्या भाजपच्या उप प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांची भेट घेणार आहेत. चित्रा वाघ यांच्या भेटीनंतर त्या लगेचच राज्याच्या मुख्य सचिवांची भेट घेण्यासाठी जाणार आहेत. त्यानंतर राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध कुमार जायसवाल, मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांची भेट घेणार आहेत. या सर्वांच्या भेटी नंतर त्या मुंबईतील कोविड केअर सेंटरमध्ये महिलांसाठी काय सुवीधा देण्यात आल्या आहेत याचा आढावा घेण्यासाठी जाणार आहेत.
एका दिवसांत एवढ्या सर्वांच्या भेटी घेऊन दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी त्या राज्यपालांची भेट घेणार आहेत. राज्यपालांच्या भेटीनंतर संध्याकाळी पुन्हा दिल्लीच्या दिशेने... यावरुन काही लक्षात आलं का?... असो जास्त लोड नका घेऊ आम्ही सांगतो... अब आप इसके पिछेकी क्रोनोलॉजी समझीये.... कोविड केअर सेंटर मधील महिला अत्याचारांविरोधात भाजपने राज्यभर आंदोलन केलं. या बाबतचा SOP सरकारने जाहीर करावा अशी मागणी भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ मागील अनेक दिवस करत आहेत. पण सरकार त्यांना योग्य प्रतिसाद देत नाही असा आरोप त्या करतात.
वास्तविक पाहता रेखा शर्मा यांनी कोविड केअर सेंटर ज्या आरोग्य विभाग व गृहविभागाच्या अंतर्गत येतात त्या विभागांच्या संबंधित मंत्र्यांचीही भेट घेणं अपेक्षित होतं. पण त्या तसं न करता राज्यपालांची भेट घेणार आहेत.
आता आपल्या राज्यपालांबद्दल लोकांचं काय मत झालंय हे वेगळं सांगायला नको. पण असो.... या संदर्भात आम्ही रेखा शर्मा यांच्याशी संपर्क साधला व संबंधित खात्यांच्या मंत्र्यांचीसुध्दा त्या भेट घेणार आहात का? असा प्रश्न केला. त्यावर बोलताना त्या म्हणाल्या "अगर उन्होने अपॉइंमेंट दिया तो जरुर मिलुंगी. मेरे PS ने लेटर दिया होगा मै उनसे बात करुंगी अभी. उन्होने अगर लेटर नही दिया होगा तो मै वही आकर ऊनसे अपॉइंटमेंट मांगुंगी."
बर हे झालं आरोग्या संदर्भात.. आता सुरक्षेची जबाबदारी ज्या गृहमंत्रालयाअंतर्गत येते त्या विभागाचे मंत्री अनिल देशमुख यांची तरी भेट घेणार का? असा प्रश्न विचारला असता "नही में मंत्रीयोंसे नही मिलनेवाली" असं त्यांनी सांगितलं. मग आम्ही राज्यपालांच्या भेटीचं कारण विचारलं तर "मै उधर आके उसके बारेमें प्रेस से बात करुंगी" असं सांगितलं. आता तुमच्या नेमकं प्रकरण लक्षात आलं असेल.
राज्यातील महिला अत्याचारांसदर्भात केंद्रीय महिला आयोगाने मुंबईत येणं निश्चीतच चांगली गोष्ट आहे. पण जेव्हा हाथरसमध्ये पीडितेचा परिवार न्यायासाठी भांडत होता किंबहूना तो अजूनही भांडतोय तिथे केंद्रीय महिला आयोगाने भेट देणं अपेक्षीत होतं पण त्यांनी तसं केलं नाही. त्यामुळे राज्यातील कोविड सेंटरमधील महिला सुरक्षेता आढावा घेतल्यानंतर त्या उत्तर प्रदेशमधील महिला सुरक्षेचा आढावा घेणार का हा प्रश्न आहे. कारण शेवटी कितीही झालं तरी त्या देशाच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत. त्यामुळे केंद्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांचा हा दौरा राजकीय प्रचार दौरा ठरु नये म्हणजे झालं.