स्वतःचा फोटो जळताना बघून मीना हॅरीस संतप्त

Update: 2021-02-06 07:50 GMT

भारतात दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा मुद्दा आता जागतिक स्तरावर चर्चिला जात आहे. आंतरराष्ट्रीय गायिका अशी ख्याती असलेल्या रिहानाने ट्विटरवरून शेतकरी आंदोलनाबाबत आपण का बोलत नाही? असा सवाल केल्यानंतर सोशल मीडिया सह मुख्य माध्यमांवर रिहानाच्या ट्विट ची मोठी चर्चा सुरु आहे.

त्याच दरम्यान आता भारतीय वंशाच्या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्रपती कमला हॅरीस यांच्या जवळच्या नातलग असलेल्या मीना हॅरीस यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देताना जगातील सर्वात मोठी लोकशाही धोक्यात आली असल्याचं म्हटले आहे.

मीना हॅरिस यांनी केलेल्या सुरुवातीच्या ट्विटमध्ये त्या म्हणतात...

आपण सगळ्यांनी भारतात इंटरनेट शटडाऊन आणि शेतकरी आंदोलनकर्त्यांवर पोलिसांचा हिंसाचार याचा निषेध व्यक्त केला पाहिजे. ज्याप्रकारे कॅपिटॉल हिलमध्ये हिंसाचार झाल्यानंतर आपण सर्वांनी प्रतिक्रिया, रोष व्यक्त केला. त्याचसारखी प्रतिक्रिया शेतकरी आंदोलनाबाबत व्यक्त करायला हवी. जगात कुठेही फॅसिझम हा लोकशाहीसाठी धोकाच असतो. ट्रम्प यांचा कार्यकाळ संपला तरी आपल्या अवतीभोवती तसे वातावरण असल्याचं ट्विट हॅरीस यांनी केलं होतं.

या ट्विट नंतर मीना हॅरीस यांनी आणखी एक ट्विट केलं असून जहालमतवादी लोक स्वत:चा फोटो जाळताना पाहून विचित्र वाटतं. मात्र, विचार करा जर आपण भारतात राहत असतो तर... मी तुम्हाला सांगते. 23 वर्षाच्या कामकार कार्यकर्त्या नवदीप कौर यांना ताब्यात घेतलं असून त्यांना पोलिस त्रास देत आहेत. त्यांचा शारीरिक छळ केला जात आहे. तिला गेल्या 20 दिवसांपासून जामीन न देता ताब्यात घेण्यात आले आहे.

असं ट्विट मीना हॅरीस यांनी केलं आहे.

मीना हॅरीस एक लेखिका असून त्यांना शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. मीना हॅरीस बरोबरच पर्यावरण कार्यकर्ते ग्रेटा थनबर्ग, पॉर्नस्टार मिया खलिफा यांनीही शेतकरी मुद्द्यावरून ट्विट केलं आहे. या ट्विट ची जगभरात चर्चा सुरु आहे.

Tags:    

Similar News