भावा बहिणीच्या प्रेमालाही महागाईची झळ

Update: 2023-08-24 12:34 GMT

 बहीण-भावाच्या प्रेमाचा सण रक्षाबंधन अवघ्या सहा दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे बाजारपेठेत विविध प्रकारच्या राख्यांनी दुकाने सजली आहेत. मात्र, इतर वस्तूंप्रमाणेच रक्षाबंधनाला महागाईचा फटका बसला असून, राख्यांच्या किमती गतवर्षीच्या तुलनेत 20 ते 25 % वाढ झाल्याचे दिसून येत आहे. वाढत्या महागाईमुळे दरवर्षीपेक्षा यंदा राख्यांच्या विक्री वर परिणाम होतो की काय असे वाटत आहे. बुलढाणा शहरात राख्यांनी सजलेली बाजारपेठ दिसून येत आहे. भाऊ-बहिणीचे नाते दृढ करणाऱ्या रंगीबेरंगी राख्यांची सध्या बाजारात अनेक दुकाने थाटल्या गेली आहेत. दोनशे रुपये डझनपासून एक हजाराहून अधिक किमतीच्या राख्या सध्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मात्र, गतवर्षी दहा रुपयांना मिळणाऱ्या राखीचा भाव यंदा 15 ते 20 रुपये झाला आहे. ही दरवाढ जवळपास दुप्पट असल्याने दुकानात खरेदीसाठी येणाऱ्या महिला वर्गांकडून नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान बाजारात थाटलेल्या दुकानांमध्ये गोंडे, स्टोन राखी, स्टोन रिंग राखी, उडन गरवी राखी, फॅन्सी जरी आणि जरदोजी, घुंघरू, लाख, राजस्थानी मिरर वर्क आणि काचेची सजावट असलेल्या राख्या लक्ष वेधून घेत आहेत. यामध्ये कलर्स स्टोन, कुंदन वर्क, कलर्ड बीड्सचाही वापर करण्यात आला आहे. सोबतच यंदा काही विशेष राख्या बाजारात पाहायला मिळत आहेत. या राख्यांवर संदेश किंवा नाव, भाऊ, दादा असे सगळे लिहिलेले असते. लहान मुलांसाठी कार्टून राखी, बॅटरीवर चकाकणारे लाईट लावलेल्या डिजिटल राख्या आल्या आहेत.

Tags:    

Similar News