अत्याचार पीडित महिलांना मोठा दिलासा, महिला आयोगाची विभागीय कार्यालये सुरू
अत्याचारपीडित महिलांना जलद गतीने न्याय मिळण्यास मदत व्हावी यासाठी राज्य महिला आयोगाची कार्यालये सर्व विभागीय आयुक्तालये, मुख्यालयांच्या ठिकाणी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याबाबतचा शासन निर्णय बुधवारी जारी करून आयोगाच्या विभागस्तरीय कार्यालयांचे प्रत्यक्ष कामकाज सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी यासदंर्भात मागणी केली होती. या निर्णयामुळे राज्यभरातील अत्याचार प्रकरणातील पीडित महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी महिला व बालविकास विभागाच्या विभागीय उपायुक्त कार्यालयात महिला आयोगाची कार्यालये सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी महिला व बालविकास विभागात सध्या उपलब्ध असलेल्या मनुष्यबळाच्या मदत घेण्यात येणार आहे.
कसे होणार कामकाज?
महिला व बालविकास विभागाच्या विभागीय उपायुक्तांनी राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव यांच्या समन्वयाने या कार्यालयांचे कामकाज हाताळावे असे निर्देश देण्यात आले आहेत. या विभागीय कार्यालयांच्या क्षेत्रातील समस्या घेऊन आलेल्या महिलांच्या समस्यांचे तातडीने निवारण व्हावे यासाठी त्या महिलेच्या इच्छेनुसार तज्ज्ञ समुपदेशकाकडून समुपदेशन केले जाणार आहे. किंवा स्थानिक पोलीस ठाण्यातून त्या महिलेला मदत उपलब्ध करून दिली जाईल. गंभीर स्वरूपाच्या तक्रारी किंवा आयोगाने स्वत: दखल घेण्यासारख्या प्रकरणात विभागीय कार्यालयांनी राज्य महिला आयोगाच्या सल्ल्याने कार्यवाही करावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.