मुक्ता टिळक यांचं मत बाद होणार?

Update: 2022-06-20 12:39 GMT

 राज्यसभा निवडणूकीत भाजपने महाविकास आघाडीच्या मतांवर आक्षेप घेतला होता. तर त्यानंतर शिवसेनेच्या सुहास कांदे यांचे मत अवैध ठरवण्यात आले होते. महाविकास आघाडीमध्ये आता एकाचा बदला दुसरा पुर्ण करताना दिसतोय. राज्यसभेपाठोपाठ आलेल्या विधानपरिषद निवडणूकीत काँग्रेसने भाजपच्या दोन मतांवर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे विधानपरिषदेचा निकालही लांबणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


विधानपरिषद निवडणूकीत मतदान पुर्ण झाले आहे. सायंकाळी पाच वाजता मतमोजणीला सुरूवात होणार होती. तर साडेसात पर्यंत विधानपरिषद निवडणूकीचा निकाल स्पष्ट होणार होता. मात्र त्यापुर्वीच काँग्रेसने भाजपच्या दोन मतांवर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे विधानपरिषदेचा निकाल लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राज्यसभा निवडणूकीत काँग्रेसच्या मंत्री यशोमती ठाकुर, राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी आपली मतपत्रिका मतपेटीत टाकताना ती दुसऱ्या पक्षाच्या प्रतोदाला दिसेल अशी पकडल्याचा आरोप भाजपने केला होता. मात्र त्यानंतर हे प्रकरण केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेले होते. तर निवडणूक आयोगाच्या बैठकीनंतर शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचे मत अवैध ठरविण्यात आले होते. त्याप्रमाणेच विधानपरिषद निवडणूकीत काँग्रेसने भाजपच्या दोन मतांवर आक्षेप घेतला आहे. तर याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणूकीप्रमाणेच विधानपरिषद निवडणूकीतही निकाल लागण्यास मध्यरात्र उजाडणार का? असा सवाल केला जात आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात राज्यसभेच्या निवडणूकीपाठोपाठ विधानपरिषद निवडणूकीत कोण बाजी मारणार याविषयी चर्चांना उधाण आले होते. तर राज्यात आरोप प्रत्यारोपांना रंगत आली होती. मात्र राज्यसभेच्या निवडणूकीत भाजपने आकड्यांचा खेळ करत तिसरा उमेदवार निवडून आणला. त्यामुळे विधानपरिषद निवडणूकीत राज्यसभेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून महाविकास आघाडी सावधगिरीने पाऊले टाकले. तर भाजपने आजारी असलेल्या लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांना व्हीलचेअरवरून मतदानासाठी आणले. यावेळी भाजप आमदार मुक्ता टिळक आणि आमदार लक्ष्मण जगताप यांची मतपत्रिका दुसऱ्या व्यक्तीने मतपेटीत टाकल्याचा आरोप निवडणूक आयोगाकडे केला आहे. त्यामुळे यावेळीसुध्दा मध्यरात्रीपर्यंत निकालाची वाट पहावी लागू शकते.

Tags:    

Similar News