संदीप देशपांडेंचा पोलिसांच्या तावडीतून पळ; पकडताना महिला पोलीस जखमी
राज्यात पहाटेपासून अजान विरुद्ध हनुमान चालीसा असं आंदोलन मनसे कार्यकर्त्यांकडून आपल्याला पाहायला मिळतंय. अशात पोलिसांनी मनसे पदाधिकाऱ्यांची धरपकड सुरू केलीये. संदीप देशपांडेंना ताब्यात घेत असताना झालेल्या झटापटीत महिला पोलीस कर्मचारी जखमी झाल्या आहेत.;
राज ठाकरे यांनी दिलेल्या अल्टीमेटम नुसार बुधवारी संपूर्ण राज्यभरात मध्ये मनसैनिक आंदोलन करताना दिसत आहेत. राज्यभरा मध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी जिथे जिथे मशिदींचे भोंगे वाजले तिथे तिथे हनुमान चालीसा वाजवली आहे. तर दुसरीकडे १ मेला औरंगाबाद च्या सभेमध्ये केलेल्या प्रक्षोभक भाषणामुळे राज ठाकरे यांच्यावर औरंगाबाद पोलिसांनी अजामीनपात्र कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. कोणत्याही क्षणी त्यांना अटक होऊ शकते. अशात अनेक मनसे पदाधिकारी हे राज ठाकरेंच्या निवासस्थानी शिवतीर्थवर त्यांच्या भेटी घेत आहेत.
मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे शिवतीर्थ बाहेर पत्रकारांशी बोलत होते. इतक्यात पोलीस त्यांना ताब्यात घेण्यासाठी आले. संदीप देशपांडे पोलिसांशी बोलत बोलत त्यांच्या गाडीपाशी गेले आणि त्यानंतर त्यांनी पोलिसांना दूर लोटत गाडी सुरू करत निघून गेले. दुसरीकडे संदीप देशपांडे यांच्या सोबत असलेले संतोः धुरी देखील तिथून पसार झाले. या सगळ्या झटापटीत महिला पोलीस कर्मचारी खाली पडल्या यात त्या जखमी झाल्याची देखील माहिती आहे. या महिला पोलिसांना उपचारांसाठी दवाखान्यात नेण्यात आले असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांना भेटीसाठी पाचारण केलं आहे.