मुंबईची बत्ती गुलवरुनही कंगनाची ठाकरे सरकारवर आगपाखड
राज्य सरकार विरोधात नेटवर मीम्सचा भडीमार सुरु असताना कोणतीही संधी साधुन ठाकरे सरकारला लक्ष करणाऱ्या कंगनानेही पुन्हा टीका केली आहे.;
मुंबई: संपूर्ण मुंबईसह महानगर प्रदेशात वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. यावर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावरून मीम्सच्या माध्यामातून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. नेटवर मीम्सचा भडीमार सुरु असताना कोणतीही संधी साधुन ठाकरे सरकारला लक्ष करणारी अभिनेत्री कंगना राणावतनेही महाराष्ट्र सरकारवर पुन्हा निशाणा साधला आहे.
वीज पुरवठा खंडित झाल्याने कंगनाने एक ट्विट केलं असून या ट्विटमध्ये शिवसेना नेते संजय राऊत आणि स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराचा फोटोही पोस्ट केला आहे. त्यानंतर या फोटोला कंगनाने कॅप्शन दिली असून 'मुंबईमध्ये Powercut, अशावेळी महाराष्ट्र की सरकार क-क-क……कंगना', अशी खोचक टीका कंगनाने केली आहे. तर, अभिनेते अनुपम खेर यांनीही 'बत्ती गुल' असं ट्विट करत महाराष्ट्र सरकारला लक्ष केले आहे. अरमान मलिकनेही वीज गेल्याचं म्हटलं आहे.
या शिवाय प्रसिद्ध लेखिका आणि स्तंभलेखिका शोभा डे यांनीही ट्विट केलं आहे. संपूर्ण मुंबईत वीज गायब झालीय. हे अनपेक्षित आहे. एखाद्या बोगद्यात असावं अशा पद्धतीने मुंबई अंधारात गेलीय, अशी टीका शोभा डे यांनी ट्वीटमधून केली आहे. हे ट्विट करताना त्यांनी मुंबई महापालिका आणि टाटा पॉवरला टॅगही केलं आहे. दरम्यान, आज संपूर्ण मुंबईत वीज पुरवठा खंडित झाल्याने मुंबई अंधारात गेली होती. महापारेषणच्या सर्किट केंद्राचे देखभाल दुरूस्तीचे काम सुरू होते. मात्र अचानक बिघाड झाल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता. यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सोमोरे जावे लागले, असं मुंबईला वीज पुरवठा करणाऱ्या प्रशासनाने स्पष्ट केलं.
दरम्यान, वीज पुरवठा खंडित झाल्याने त्याचा परिणाम मुंबईच्या लोकलवर देखील झाला. त्यामुळे मुंबईकडे कामावर येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रचंड खोळंबा झाला. या चाकरमान्यांना सुमारे दोन ते अडीच तास लोकलमध्ये खोळंबून राहावे लागले होते. त्यामुळे अनेक प्रवासी संतापही व्यक्त करत होते. तब्बल तीन तासाच्या प्रयत्नाने टप्प्याटप्प्याने वीज पुरवठा सुरळीत झाला असून मुंबईकरानी सुटकेचा निश्वास टाकला आहे.