सोन्याच्या भावात चढ उतार सुरूच; त्यामुळे सोनं खरेदी करन योग्य राहील का?
मुंबई: गेल्या वर्षी कोरोना काळात म्हणजेच मे आणि जूनच्या महिन्यात 58 हजार रुपयांच्या घरात गेलेले सोन्याचे दर ह्या वर्षी 47 हजार रुपयांपर्यंत खाली आले आहेत. सद्या जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात सोन्याच्या दरात तब्बल दीड ते दोन हजार रुपयांपेक्षा अधिक घसरण नोंदवली गेली. त्यानंतर सातत्याने सोन्याचे दर 100 ते 200 रुपयांनी कमी-अधिक राहिले. जळगाव सराफ बाजारात 24 कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्याला जीएसटीशिवाय 47 हजार रुपये, तर 3 टक्के जीएसटीसह विक्रीचे दर 48 हजार 400 रुपये प्रतितोळा असे नोंदवण्यात आले.
सोने चांदीच्या दरांबाबत बोलताना जळगाव जिल्हा सराफ असोसिएशनचे सचिव स्वरूपकुमार लुंकड यांनी मॅक्सवूमन ला सांगितलं की, कोरोनाची भीती कमी झालेली आहे, लस बाजारात आली आहे, तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलचे दर भडकले आहेत. त्यात दुसरीकडे, अमेरिकन डॉलरचे अवमूल्यन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून हिच स्थिती आंतरराष्ट्रीय बाजारात कायम आहे. त्याचप्रमाणे, सुरक्षित परतावा मिळावा म्हणून गुंतवणूकदारांकडून सोन्याऐवजी अन्य पर्यायांना प्राधान्य दिले जात असल्याने, सोन्याची मागणी घटली आहे. या प्रमुख कारणांमुळे सोन्याचे दर घसरत असल्याचं लुंकड म्हणाले.
लग्नसराई जवळपास संपल्याने स्थानिक बाजारातही सोन्याला फारसा उठाव नाही. जून महिन्याच्या सुरुवातीपासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर अस्थिर व्हायला सुरुवात झाली आहे. त्याचा परिणाम स्थानिक बाजारपेठेवरही होत आहे. जूनच्या पहिल्या दोन आठवड्यात सोन्याचे दर तब्बल दीड हजारांपेक्षा अधिक-कमी झाले. आता सोने 47 हजार रुपयांच्या जवळपास स्थिरावल्याचे दिसून येत आहे. हे दर प्रत्येक दिवसाला 100 ते 200 रुपयांनी कमी-अधिक होत असल्याचे चित्र सराफ बाजारात आहे.
दरम्यान पुढच्या काही महिन्यात सण सुरू होतील गणपती, दसरा, दिवाळी येत आहे, यामुळे हे भाव वाढू शकतात असंही काही जाणकारांचे मत आहे. आता सोन्याचे दर कमी आहेत आपल्या कडे पैसे असतील तर 20 टक्के सोन्यात गुंतवणूक करण्यास काही हरकत नाही असेही तंज्ञाच मत आहे.