अनिष्ट रूढी परंपरेने मान सन्मान नाकारलेल्या विधवा महिलांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याची अभिमानास्पद घटना सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यात असणाऱ्या बनेवाडी या गावात घडली आहे.
देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील स्त्री पुरुष समानतेचा उल्लेख आपल्या आजच्या भाषणात केला. पण ज्यांना समाजामध्ये तुच्छ लेखले जाते. सण समारंभात बाजूला बसवले जाते अशा विधवा महिलांच्या हस्ते बनेवाडी येथे आज सकाळी ध्वजारोहण करण्यात आले. कल्पना विलासराव शिंदे, रुक्मिणी पांडुरंग काशीद, जिजाबाई शिवाजी जगताप या महिलांनी ध्वजारोहण केले.
तत्पूर्वी माजी सभापती भारत काका डूबुले यांनी सर्व जिल्ह्यात असा उपक्रम घ्यावा असे पत्र दिले होते. याची सुरवात त्यांनी आपल्या बनेवाडी या गावातच केली. या कार्यक्रमास महिला सरपंच वैशाली माळी उपसरपंच आश्र्विनी जगताप यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच नागरिकांनी या क्रांतिकारी सोहळ्याला उपस्थिती लावली होती .