विधवा प्रथेचे निर्मूलन करणाऱ्या महिला सन्मानार्थ निर्णयाचा मला सार्थ अभिमान - ॲड. यशोमती ठाकूर
विधवा प्रथेचे निर्मूलन करणाऱ्या महिला सन्मानार्थ 'हेरवाड पॅटर्न'ची महाराष्ट्रातील पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्र सरकारने अंमलबजावणी सुरू केल्याने राज्याची महिला व बाल विकास मंत्री म्हणून मला सार्थ अभिमान वाटतो. समाजात प्रचलित अनिष्ठ विधवा प्रथेचे निर्मूलन होण्यासाठी यापुढे हा ठराव राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत मांडला जाण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींना प्रोत्साहित करण्याचे निर्देश राज्याच्या ग्रामविकास विभागाने दिला आहे, यामुळे राज्यातील महिलांचा या अनिष्ठ व जाचक बंधनातून मुक्त होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लोकराजा राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर हा ऐतिहासिक पुरोगामी निर्णय शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचारांना अधिक बळकटी देणारा आहे. अखेर आमच्यासह सर्वांच्याच पाठपुराव्याला मिळालेले हे यश आहे. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने महाराष्ट्राने टाकलेले क्रांतिकारी विचारांचे क्रांतिकारक पाऊल म्हणावे लागेल अशी प्रतिक्रिया राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर व्यक्त केली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड (शिरोळ) ग्रामपंचायतीने महिलांच्या सन्मानार्थ घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाला आमचा सर्वांचाच पाठिंबा होता. त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे समजताच सदर निर्णयाचे मी स्वागत करून या ग्रामसभेच्या निर्णय प्रक्रियेतील सर्वांशी मी संपर्क साधत त्यांचे अभिनंदन केले होते. शिवाय याबद्दल मुंबईतील भेटी दरम्यान हेरवाड ग्रामस्थांचा गौरवही केला होता. कोणत्याही महिलेला एक व्यक्ती म्हणूनच स्वतंत्रपणे जगण्याचे स्वातंत्र्य संविधानाने बहाल केले आहे. त्यामूळे त्यांना अन्य कोणत्याही बंधनात ठेवणे हा कायद्याने गुन्हा ठरतो. आज २१व्या शतकात वावरत असताना, विज्ञानवादी व प्रगतीशील समाज म्हणून आपण वाटचाल करत आहोत. मात्र, आजही समाजात विधवा प्रथेसारख्या अनिष्ट प्रथा प्रचलित असल्याचे आढळून येते. पतीच्या निधनावेळी पत्नीचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातील जोडवी काढली जाणे यांसारख्या कुप्रथांचे समाजात पालन केले जात आहे. या महिलांना त्यानंतर समाजात कोणत्याही प्रकारच्या धार्मिक व सामाजिक कार्यक्रमात सहभागी होवू दिले जात नाही. या कुप्रथांचे पालन होत असल्याने अशा व्यक्तींच्या प्रतिष्ठेने जीवन जगण्याच्या मानवी तसेच संविधानिक अधिकारांचे उल्लंघन होते .सदर महिलांना इतर महिलांप्रमाणे सन्मानाने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे विधवा प्रथेचे निर्मूलन करून महिलांना समानतेने आणि सन्मानाने जीवन जगण्याच्या दिशेने टाकलेले हे अत्यंत क्रांतिकारी व पुरोगामी पाऊल आहे. त्यामुळे लवकरच हा निर्णय 'हेरवाड पॅटर्न' म्हणून राज्यासह देशात 'राबविला जाईल असा मला विश्वास वाटतो, असेही त्या म्हणाल्या.
ग्रामपंचायत हेरवाड जि. कोल्हापूर यांनी केलेल्या ग्रामसभा ठरावा प्रमाणेच राज्यातील सर्व ग्रामपंचायतीना ठराव घेणेबाबत प्रोत्साहीत करावे. राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षात त्यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा पुढे नेण्याच्या दृष्टीने कृतीशील कार्यवाही करावी असा निर्णय राज्याच्या ग्रामविकास विभागाने घेतला आहे. याचे मी मन:पूर्वक स्वागत करते आणि महाविकास आघाडी सरकारचे अभिनंदन करीत त्यांनी मुख्यमंत्री व सर्व मंत्रीमंडळाचे धन्यवाद देत असल्याचे सांगतले आहे.