नोकरी करणाऱ्या महिलांची सुरक्षेच्या दृष्टीने नियमावली तयार करण्याचे गृहमंत्र्यांचे निर्देश

Update: 2021-10-14 14:35 GMT

राज्यातील विविध माहिती तंत्रज्ञान प्रकल्पांमध्ये काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसंदर्भात उपाययोजना करण्यासाठी गठीत समितीने सुचविलेल्या शिफारशींच्या अनुषंगाने आज मंत्रालयात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.




 



संघटित व असंघटित क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर महिला नोकरी करत आहेत. या सर्व महिलांची सुरक्षा हा राज्य शासनाच्या दृष्टीने प्राधान्याचा विषय असून गृहविभागाने सर्वसमावेशक मार्गदर्शक नियमावली तात्काळ तयार करून जाहीर करावी, असे निर्देश गृहमंत्र्यांनी दिले.



महिलांची सुरक्षा या विषयाला दिवसेंदिवस व्यापक स्वरूप प्राप्त होत आहे. आज महिला विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. कामाच्या निमित्ताने त्या रात्री उशिरापर्यंत बाहेर असतात, याची बैठकीत दखल घेण्यात आली.



माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी सर्व विभागाच्या नियमांचे तसेच वेळोवेळी गठीत केलेल्या समितीच्या शिफारशीचा अभ्यास करून गृह विभागाने लवकरात लवकर मार्गदर्शक तत्वे जाहीर करावीत, असे गृहमंत्री म्हणाले.




 



तसेच त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अपर मुख्य सचिव, गृह यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. या मार्गदर्शक नियमावलीबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात यावी अशा सूचनाही गृहमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

Tags:    

Similar News