हिजाब घालून आलेल्या मुलीला घोळख्याने घेरले, वास्तवातील ट्रोलर्सना सामोरं जाणारी धैर्यवान तरुणी..
कर्नाटकमध्ये सध्या सुरू असलेल्या हिजाबच्या वादाच्या पार्श्वभूमीवर भगवे स्कार्फ परिधान केलेले विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी कॉलेजकडे जाताना 'जय श्री राम'च्या घोषणा देत एका मुस्लिम मुलीला घेरले आहे. समाजमाध्यमांवर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून हिजाबच्या वादाने राजकीय रंग घेतला आहे...
कर्नाटकातील उडुपी येथील महात्मा गांधी मेमोरियल कॉलेजमध्ये हिजाब (Hijab) परिधान करण्याच्या मागणीवरून वाद चांगलाच चिघळताना दिसत आहे. उडुपी येथील महात्मा गांधी मेमोरियल कॉलेजमध्ये हिजाब परिधान केलेले विद्यार्थी आणि भगवे टोले-हेडगियर घातलेल्या विद्यार्थ्यांच्या दुसर्या गटाने कॉलेज कॅम्पसमध्ये घोषणा दिल्याने जोरदार निदर्शने सुरू केली आहे.भगवे स्कार्फ घातलेल्या गुंडांच्या झुंडीने एका मुस्लिम मुलीला घेरले आहे आणि तिला धमकावण्याचा प्रयत्न करत आहे, असा व्हिडीओ देखील वायरल झाला आहे.
महाविद्यालय प्रशासनाच्या कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय विद्यार्थ्यांना हिजाब परिधान करून वर्गात जाण्याची परवानगी देण्यासाठी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिकासुध्दा दाखल करण्यात आली होती. आज कर्नाटक उच्च न्यायालय राज्यातील अनेक कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये हिजाब बंदीविरोधातील या याचिकेवर सुनावणी करणार आहे. या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी मेमोरियल कॉलेजमध्ये हिजाब परिधान केलेले विद्यार्थी आणि भगवे टोले-हेडगियर घातलेल्या विद्यार्थ्यांच्या दुसर्या गटाने कॉलेज कॅम्पसमध्ये निदर्शने सुरू केली आहे.
कर्नाटकमध्ये सध्या सुरू असलेल्या हिजाबच्या वादाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक नवीन घोषणा करत सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये गणवेशाचा नियम लागू करण्याची सूचना केली आहे. कर्नाटक सरकारच्या शिक्षण विभागाने म्हटले आहे की, सर्व सरकारी शाळांनी राज्य सरकारने ठरवून दिलेल्या गणवेश संहितेचे पालन करावे, तर खासगी संस्थांच्या विद्यार्थ्यांनी शाळा व्यवस्थापनाने ठरवून दिलेल्या ड्रेसचे पालन करावे. यासोबतच देशाची एकता, अखंडता, समता आणि सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा पोहोचवणाऱ्या कपड्यांवर शाळा आणि महाविद्यालयांमध्ये बंदी घालण्यात येणार आहे. सरकारने कर्नाटक शिक्षण कायदा, 1983 चे 133(2) लागू केले आहे, ज्यात शाळांमध्ये गणवेश परिधान करणे अनिवार्य आहे.