"मृत्यु पप्पांना आधीच दिसला होता का?", आबांच्या लेकीची भावनिक पोस्ट व्हायरल...

Update: 2021-11-09 06:02 GMT

वडील नी मुलीच नातं किती भावनिक असतं हे आपल्याला वेगळं सांंगायला नको. अशात जेव्हा अचानक वडील कायमचे निघून जातात तेव्हा मुलीच्या मनात काय खळबळ माजते हे दिवंगत नेते आर.आर.पाटील यांची कन्या स्मिता पाटील यांनी आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये व्यक्त केलं आहे. काय म्हणल्या आहेत स्मिता पाटील पाहूयात.

पप्पांचा शेवटचा दिवस !

आज 8 नोव्हेंबर... बरोबर 7 वर्ष झाली माझ्या वडीलांना आज घरातून शेवटचं बाहेर जाऊन..! आजच्या दिवशी 2014 मध्ये सकाळी 11 वाजता माझ्या वडीलांनी घर सोडलं.

"काही दिवस दिल्लीला विश्रांतीसाठी निघालोय", असं पप्पांनी माझ्या आजीला सांगितलं होतं. 3 नोव्हेंबरला नव्या विधानसभेच्या पहिल्याच अधिवेशनात पप्पांनी अत्यंत घणाघाती भाषण केलं होतं. या भाषणाचं महाराष्ट्र विधानसभेने टाळ्यांच्या कडकडाटात अभिनंदन केलं होतं. 6 नोव्हेंबर ला पप्पा अंजनीला घरी आले. हेलिकॉप्टर मधुन सगळं गाव दोन तिनदा फिरून बघितलं.

घरातून बाहेर जाताना पप्पा नेहमी उपस्थित सर्व लोकांना अभिवादन करत असत. त्याच प्रमाणे खिडकीतून सर्व कुटुंबीयांना बघुन जात असत. पण त्या दिवशी मात्र पप्पा जाताना लोकांच्या मधुन वेळ काढून आमच्या रूममध्ये आले. मी व माझी बहिण सुप्रिया आम्ही वर आमच्या रूम मध्ये होतो. तर पप्पांनी त्या दिवशी वर येऊन आम्हा दोघी बहिणींना घट्ट मिठी मारली. त्या क्षणी त्यांच्या डोळ्यात पाणी उभारलं होतं. आम्ही दोघी बहिणी ही विचार करू लागलो की पप्पांना असं काय वाटलं असावं की त्यांनी मिठ्ठी मारली आणि त्यांच्या डोळ्यात पाणी उभारलं असावं?

आम्हाला वाटलं नव्हतं की, आज पप्पांनी आम्हाला शेवटचे कुशीत घेतलं असावं. त्या दिवशी पप्पांनी गावच्या मारुती-शंकराचंही न चुकता दर्शन घेतलं होतं. स्वतःच्या गावात चावडीसमोर निवडून आल्याबददल सत्कार स्वीकारताना पप्पा म्हणाले होते की, स्वतःच्या गावाकडून हा माझा शेवट चा सत्कार ठरावा! आता आणखी किती सत्कार करणार..? मृत्यु पप्पांना आधीच दिसला होता का?

Tags:    

Similar News