कोथरुड विधानसभा मतदार संघाच्या भाजपाच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी या भाजप सोडून मनसे पक्षात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये व्हायरल झाल्या. हे वृत्त मेधा कुलकर्णी यांनी फेटाळून लावत "मी कुठल्याही पक्षात चालली नाहीये. मी भाजपमध्येच आहे. पक्षबदलाच्या वावड्या जाणीवपुर्वक उठविल्या जात आहेत. त्यात काही तथ्य नाही" असे सांगितले. त्यांनी फेसबुकला हा व्हिडीओ शेअर केला आहे.
काय म्हणाल्या मेधा कुलकर्णी...
"गेले दोन दिवस माझ्या संदर्भातील ज्या खोट्या बातम्या मुद्दामून प्रसारित केल्या जात आहेत त्याचं स्पष्टीकरण करण्यासाठी आवर्जून मी आपल्यासमोर उपस्थित आहे. मी कुठेही जात नाहीये, भाजपातच आहे. यापूर्वीही मी कधीही कोणत्याही राजकीय नेत्यांच्या संपर्कात नव्हती, आजही नाही. मागच्या वर्षी जेव्हा मला विविध पक्षांकडून ऑफर्स आल्या होत्या, त्यावेळीही नम्रपणे नकार दिला होता. पक्षांतर्गत काही प्रश्न जरुर आहेत. पण या प्रश्नांची उत्तरं पक्षीय पातळीवर सोडवली जातील अशी आशा आहे त्यामुळे त्याबद्दल जाहीर वाच्यता करण्याची गरज वाटत नाही," असं मेधा कुलकर्णी यांनी म्हटलं आहे.