दुरुस्तीच्या कामासाठी बंद असलेली पुणे विमानतळावरील हवाई वाहतुक उद्यापासून सुरू होणार, पण...
मागील 13 दिवसांपासून बंद असलेली पुणे विमानतळारील हवाई वाहतूक पुन्हा सुरु होणार आहे. याठिकाणी तिकीट बुकिंग सेवा पूर्ववत झाली आहे. उद्या सकाळी 8 वाजता प्रवासी वाहतूक पुन्हा सुरु होईल. मात्र, रात्री आठ ते सकाळी आठ दरम्यान वाहतूक बंदच राहणार आहे. रात्रीची विमान वाहतूक सुरू होण्यासाठी आणखी दोन महिने वाट पहावी लागेल. धावपट्टीच्या दुरुस्तीचे कामासाठी विमानतळावरून वाहतूक 16 ते 29 ऑक्टोबर दरम्यान बंद ठेवण्यात आली होती. यापूर्वी दसऱ्याच्या दिवशी पुणे विमानतळावरुन तब्बल 63 विमानांनी उड्डाण केले होते. या काळात 18 हजार प्रवाशांनी प्रवास केला.
पुण्यात विमान प्रवासी वाहतुकीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सध्या असलेल्या इमारतीत प्रवाशांची मोठी गर्दी होते. प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी पुणे विमानतळ प्राधिकरणाकडून 5 लाख चौरस फुटापेक्षा जास्त क्षेत्रफळ आणि अत्याधुनिक सोयीसुविधा असलेलं इंटिग्रेटेड टर्मिनल बांधण्यात येणार आहे. या टर्मिनलमध्ये दरवर्षी 1 कोटी 90 लाख प्रवाशांना सामावून घेण्याची क्षमता असणार आहे. 30 ऑगस्ट रोजी विमानतळ प्राधिकरणाची बैठक झाली होती. त्यावेळी विमानतळ विस्तारीकरणाबाबत आढावा घेण्यात आला होता.