इंगळे कुटूंब ठरतंय समाजासाठी आदर्श, शेतकरी बापानं दोन मुलींना केलं PSI
मुलगी शिकली प्रगती झाली हे घोषवाक्य खरं करून दाखवतोय हा शेतकरी बाप!
उस्मानाबाद तालुक्यातील दारफळ हे अत्यंत छोटंसं खेडेगाव. या गावातील संभाजी इंगळे या शेतकऱ्याला तीन मुली एक मुलगा. स्वतःचे शिक्षण पुर्ण झाले नाही म्हणुन संभाजी इंगळे यांनी ५ एकर जमिनीत काबाडकष्ट करून वेळप्रसंगी व्याजाने पैसे काढून मुलगा - मुलगी भेदभाव न करता चारही मुलांना शिकवलं. त्यातल्या दोन मुलींना स्पर्धा परिक्षेसाठी प्रोत्साहन दिलं. आजच्या घडीला संभाजींच्या दोन्ही मुली PSI बनल्या आहेत. यामुळे हे इंगळे कुंटूब समाजाचा आदर्श ठरलं आहे.
वडिलांची इच्छा व कष्ट लक्षात घेऊन मोठी मुलगी संजीवनीने स्वतःसह भावंडाच्या शिक्षणासाठी कष्ट घेतले. शेतात मजुर न लावता आई - वडिलांसोबत सर्व भावंडांनी कष्ट करून अभ्यास केला. वडिलांचा आदर्श व मोठया बहीणीच्या मार्गदर्शनाखाली भ्रष्टाचारमुक्त कार्य करणार आहे. शिवाय ज्या पद्धतीने तत्कालीन जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी रायते यांचे सहकार्य लाभले त्यांच्या आदर्शाप्रमाणे समाजातील विद्यार्थांना मदत करणार असल्याचे मत सरोजिनी इंगळे यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांना भावना अनावर झाल्या होत्या. तर जगताना किरकोळ बचत व आत्मविश्वास यश देतो त्यामुळे कष्ट केल्यास फळ नक्कीच मिळते असं त्यांनी सांगितलंय.