अंखी दास यांनी दिला फेसबुक इंडियाच्या पब्लिक पॉलिसी विभागप्रमुख पदाचा राजीनामा
केंद्र सरकारच्या विरोधातील पोस्ट फेसबूकवरुन हटवल्याचा त्यांच्यावर आरोप होता.
फेसबूकच्या भारतातील पब्लिक पॉलिसी विभागाच्या प्रमुख अंखी दास यांनी राजीनामा दिला आहे. फेसबुक कंपनीने यासंदर्भात माहिती दिल्याचं ट्वीट पीटीआय वृत्तसंस्थेनं केलं आहे. अंखी दास या ऑक्टोबर २०११ पासून फेसबुक इंडियासाठी काम करत होत्या. फेसबुकच्या आधी त्या भारतातील मायक्रोसॉफ्टमध्ये पब्लिक पॉलिसी हेड होत्या. जानेवारी २००४ मध्ये त्या मायक्रोसॉफ्टमध्ये रुजू झाल्या होत्या.
दरम्यान, मुंबईवरील हल्ल्याला दहा वर्षे पूर्ण झाली तेव्हा म्हणजेच 24 नोव्हेंबर 2018 ला अंखी दास यांचा लेख प्रसिद्ध झाला होता. त्याचं शीर्षक होतं- No Platform For Violence या लेखात त्यांनी म्हटलं होतं की, फेसबुककडे तज्ज्ञांची एक टीम आहे. यामध्ये माजी सरकारी वकील, कायदेतज्ज्ञ, कट्टरतावाद विरोधी संशोधक, बुद्धिजीवी सहभागी आहेत. त्याचबरोबर जिथे कट्टरतावादी कारवाया चालतात अशा केंद्रातील भाषा समजणारे लोकही आहेत.
एकूणच त्यांच्या लेखाचा सूर असा होता, की फेसबुक कट्टरतावादाशी संबंधित गोष्टींचा प्रचार-प्रसार करणाऱ्या गोष्टी पकडण्याबद्दल अतिशय सजग आहे आणि त्यावर त्यांचं प्रभावी नियंत्रणही आहे.